गणवेश खरेदीसाठी पालकांची धावपळ

। नेरळ । प्रतिनिधी ।
कोरोनाच्या महामारीमध्ये दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्या संकटामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. 15 जूनपासून बहुतांश शाळा सुरू होणार असल्याने गणवेश खरेदीसाठी पालक आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली आहे. दोन वर्षांनंतर लहान मुले प्रत्यक्ष शाळेत जात असल्याने त्यांना गणवेश खरेदी करावा की नाही? अशी परिस्थिती होती कारण कोरोनाची चौथी लाट येते की काय असे वाटत होते. परंतु शाळा वेळेवर सुरू होणार असल्याने गणवेश खरेदीसाठी अनेक दुकानांमध्ये गर्दी दिसत होती. कर्जत तालुक्यातील कर्जत आणि नेरळ येथील मोठ्या बाजारपेठेत कपड्याची दुकाने आणि पुस्तकांची दुकाने पालक वर्गाच्या गर्दीने फुल्ल झाली आहेत. त्यात प्रत्येक शाळेचा वेगवेगळा गणवेश असल्याने आणि कोणत्या शाळेचा कोणता गणवेश आहे? हे पूर्ण पणे माहीत नाही. त्यामुळे दुकानदारांनाही मोठा प्रश्‍न पडत आहे. असे असले तरी पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्साह असल्याने दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. गणवेश तसेच पुस्तके यांच्यासोबत पावसाळी चपला तसेच लहान मुलांसाठी रेनकोट, दफ्तरे, मोठ्या मुलांसाठी छत्र्या यांची सुद्धा गरज भासत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात पालक जाताना दिसत असल्याने डि मार्ट सारख्या दुकानात मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे.

Exit mobile version