। मुरुड । सुधीर नाझरे ।
काबाडकष्ट करुन पाल्यांना उत्तम शिक्षण दिले; पण नोकरी नाही. त्यामुळे हताश झालेल्या पालकांनाही शेकापच्या रोजगार मेळाव्याने दिलासा मिळाला.पाल्यांना मुलाखती द्या, नियुक्तीपत्रे घ्या, या टॅगलाईनमुळे नोकरी मिळाल्याने पालकांचा चेहराही आनंदाने फुलल्याचे दिसून आले.
शेकापच्यावतीने मुरुडच्या नाईक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील पहिल्याच रोजगार मेळाव्यास शेकडो युवक,युवतींसह त्यांचे पालकही सहभागी झाल्याचे आशादायी चित्र दिसून आले.आपल्या पाल्याला नोकरी मिळाली पाहिजे. त्याचे पुढील जीवन मार्गी लागले पाहिजे. अशीच त्या पालकांची भूमिका होती.अनेकांनी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.आम्हाला परिस्थितीमुळे शिकता आले नाही.पण आम्ही पोटाला चिमटा काढून,प्रसंगी काबाडकष्ट करुन पोटच्या गोळ्याला शिकविले. तो शिकल्याने घराचा उद्धार होईल, अशी अपेक्षाही बाळगली. पण शिक्षण होऊनही नोकरी नाही. त्यामुळे पाल्यासह आम्ही पालकही नाराज होतो.पण शेकापने रोजगार मेळावा आयोजित करुन सर्वानाच दिलासा दिला आणि अनेक पाल्यांना थेट मुलाखतीतून नोकर्याही मिळवून दिल्या, अशा सामुहिक प्रतिक्रिया मेळाव्यात ऐकावयास मिळाल्या.
हा मेळावा आयोजित करुन शेकापच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पाटील परिवाराचा सामाजिक,शैक्षणिक कार्याचा वसा प्रभावीपणे जोपासला असल्याची भावनाही पालकवर्गातून व्यक्त केली जात होती.
मुरुडमध्ये पहिलाच रोजगार मेळावा असल्याने त्याबाबत कमालीची उत्सुकताही लागली होती.आयोजकांतर्फे नियोजनही उत्तमरित्या करण्यात आल्याने कुठेही गडबड न होता अत्यंत उत्साहात हा मेळावा यशस्वी झाला.मेळाव्यातील सहभागी झालेल्या युवक,युवतींनीही उदंड प्रतिसाद दिला.मुलाखती कशाप्रकारे घेतल्या जातात,काय,काय प्रश्न विचारले जातात याची माहितीही युवापिढीला यानिमित्ताने झाली.असेच मेळावे दरवर्षी आयोजित केले जावेत,अशा अपेक्षाही सर्वस्तरातून व्यक्त केल्या गेल्या. स्थानिक शेकाप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही अतिशय मेहनत घेत पहिलाच रोजगार मेळावा यशस्वी करुन दाखविला.त्यामुळे उपस्थित शेकाप नेते पंडित पाटील यांनीही सर्वांचे मनापासून कौतुक केले.