गुरुवारी चौल येथील दत्त टेकडीला परिक्रमा

वार्डे गुरुजी नवनाथ आरती मंडळाचा उपक्रम

| चौल | प्रतिनिधी |

‌‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या दत्तनामाच्या जयघोषात चौल-भोवाळे येथील दत्त टेकडीला गुरुवारी (दि. 27) परिक्रमा घालण्यात येणार आहे. ढोलताशाच्या गजरात दुपारी 2.30 वाजता या सोहळ्यास प्रारंभ होईल, अशी माहिती वार्डे गुरुजी नवनाथ आरती मंडळ, चौलच्यावतीने देण्यात आली आहे. परिक्रमेचे यंदाचे हे पाचवे वर्षे आहे.

दत्तटेकडीला परिक्रमेआधी दत्त मंदिरास 108 प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. हा सोहळा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या गुरुवारी पार पडतो. परंतु, दुसऱ्या गुरुवारी दत्तगुरुंची पाच दिवस यात्रा भरणार असल्याने प्रदक्षिणेचा सोहळा दि. 11 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी, परिक्रमेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आशिष वासुदेव, सचिन राऊत, निकेश घरत, अरुण टेकाळकर, संदीप नागावकर आणि वार्डे गुरुजी नवनाथ आरती मंडळाचे सभासद मेहनत घेत आहेत. तरी, दत्त परिक्रमेस मोठ्या संख्येने सर्व दत्तभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वार्डे गुरुजी नवनाथ आरती मंडळ, चौल यांनी केले आहे. परिक्रमा सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी निकेश घरत 8308700830/7666079953 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

असा असेल परिक्रमेचा मार्ग
संपूर्ण दत्त डोंगराला प्रदक्षिणा घालण्यात येणार असून, पायी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. परिक्रमेस दुपारी 2.30 वाजता दत्त मंदिरातून सुरूवात होईल. स्वामी समर्थ मंदिरमार्गे चौल-सराई, सोमेश्वर मंदिर, हनुमानपाडा, गायचोळे अशी मार्गक्रमणा करीत भोवाळे येथून दत्त मंदिर मुख्य प्रवेशद्वार व त्यानंतर पायरी मार्गाने मंदिराकडे मार्गस्थ होईल, याची दखल दत्तभक्तांनी घ्यावी, असे आवाहन वार्डे गुरुजी नवनाथ आरती मंडळाच्या प्रमुखांनी केले आहे. दत्त परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जवळपास तीन तासांहून अधिकचा कालावधी लागतो. दत्त महाराजांच्या पालखीचे मंदिरात प्रस्थान झाल्यानंतर महाआरती होईल. त्यानंतर परिक्रमा सोहळ्याची सांगता होणार आहे.
27 नोव्हेंबरपासून अखंड हरिनाम
चौल-भोवाळे येथील दत्तयात्रा गुरुवार, दि. 4 डिसेंबरपासून पाच दिवस भरणार आहे. त्यानिमित्त गुरुवार, दि.27 नोव्हेंबरपासून दत्तमंदिरात अखंड हरिनामास प्रारंभ होणार असून, पंचक्रोशितील अठरा गावे या कार्यक्रमात सहभागी होत असतात.
श्रीदत्तमंदिर प्रदक्षिणा 11 डिसेंबरला
पर्वतनिवासी दत्तगुरुंच्या मंदिराला मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी 108 प्रदक्षिणा घालण्यात येतात. परंतु, यंदा दुसऱ्या गुरुवारी म्हणजे दि. 4 डिसेंबरपासून दत्तयात्रेस प्रारंभ होत आहे. दरम्यान, भाविक भक्तांची मोठी गर्दी दत्तटेकडीवर असते. त्यामुळे भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, तसेच सोहळ्यात कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून मंदिरास प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम यात्रेनंतर म्हणजेच गुरुवार, दि. 11 डिसेंबर रोजी होणार आहे. याची सर्व दत्तभक्तांनी नोंद घ्यावी, असे आवाहन वार्डे गुरुजी नवनाथ आरती मंडळाकडून करण्यात आले आहे.
Exit mobile version