| चौल | प्रतिनिधी |
चौल भवाळे येथील पर्वतनिवासी दत्त मंदिरातून दत्तमहाराजांच्या पादुकांची पायी पालखी परिक्रमा सोहळा गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी सात वाजता सुरुवात आहे. कोरोनाच्या निर्बंधमुक्ती वातावरणानंतर पहिल्यांदाच हा भव्य सोहळा होणार आहे. यंदाचे हे पालखी परिक्रमेचे चौथे वर्ष आहे. श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबागचे अध्यक्ष महेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमहाराजांच्या पादुकांच्या पायी पालखी परिक्रमेणेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पर्वतनिवासी दत्तात्रेयांचे स्वयंभू स्थान असलेल्या संपूर्ण भोवाळे डोंगराला पालखी प्रदक्षिणा घालण्यात येणार यादरम्यान दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोष, टाळ मृदंगाचा गजर, पादुका आणि मूर्तीवर पुष्पवृष्टी, मंदिरात केलेली विविधरंगी फुलांच्या माळांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे.
हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर भाविकांची गर्दी होत असते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्तकृपा अन्नछत्र ट्रस्ट अलिबाग विश्वस्त मंडळ संस्थापक अध्यक्ष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सागर कुंड, चौल ग्रामस्थ व दत्तभक्त मेहनत घेत आहेत. सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी 9372210932 या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी असेल मार्गक्रमणा
ही पालखी चौल भोवाळेमार्गे मुख्य रस्त्यावरुन चौलनाका, चौल भाटगल्ली, सागमळा, चौलमळा येथून पुढे देवघर, सराई, हनुमानपाडा अशी मार्गक्रमणा करीत येथून दत्तमंदिरात मार्गस्थ होणार आहे. पालखीच्या वाटेवर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून पिण्याचे पाणी आणि सरबत, मध्यान्ह भोजनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखी परिक्रमणेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मंदिरात महाआरती झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
पालखी परिक्रमेचे हे सलग चौथे वर्ष आहे. कोरोनाचे सावट असतानाही दत्तभक्तांनी चांगली साथ आपण अखंडितपणे हा सोहळा साजरा केला आहे. आता तर निर्बंधमुक्त वातावरण असल्याने जास्तीत जास्त भक्तांनी या परिक्रमेत सहभागी व्हावे. – महेश मोरे, अध्यक्ष, अन्नछत्र ट्रस्ट