नवनाथ आरती मंडळ, चौलचा उपक्रम
| चौल | प्रतिनिधी |
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. या दत्तनामाच्या जयघोषात चौल-भोवाळे येथील दत्त टेकडीला उद्या गुरुवारी (दि. 12) परिक्रमा घालण्यात येणार आहे. परिक्रमेचे हे तिसरे वर्ष आहे. ढोलताशाच्या गजरात दुपारी दोन वाजता या सोहळ्यास प्रारंभ होईल, अशी माहिती नवनाथ आरती मंडळ, चौलच्यावतीने देण्यात आली आहे.
चौल पर्वतनिवासी दत्तमंदिराला 108 प्रदक्षिणा घालण्याचा सोहळा नुकताच या मंडळाच्या माध्यमातून मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दि. 5 डिसेंबर रोजी उत्साही आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या प्रदक्षिणा सोहळ्यास चौल पंचक्राशितील शेकडो दत्तभक्त टेकडीवर उपस्थित होते. प्रत्येकाच्या मुखातून फक्त दत्तनामाचा जप होत होता. त्यामुळे संपूर्ण परिसर दिगंबराच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दरम्यान, या प्रदक्षिणेच्या यशस्वी आयोजनानंतर उद्या गुरुवारी (दि. 12) दुपारी दोन वाजता दत्त परिक्रमा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्त मंदिराचे गुरव प्रभाकर आगलावे, आशिष वासुदेव, सचिन राऊत, निकेश घरत आणि नवनाथ आरती मंडळ, चौलचे सभासद मेहनत घेत आहेत. तरी, दत्त परिक्रमा सोहळ्यास मोठ्या संख्येने दत्तभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आरती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. परिक्रमा सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी निकेश घरत 8308700830 यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा असेल परिक्रमेचा मार्ग
संपूर्ण दत्त डोंगराला प्रदक्षिणा घालण्यात येणार असून, पायी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. परिक्रमेस दुपारी दोन वाजात मंदिरातून प्रारंभ होईल. स्वामी समर्थ मंदिरमार्गे चौल-सराई अशी मार्गक्रमणा करीत दत्त मंदिर मुख्य प्रवेशद्वार व त्यानंतर पायरी मार्गाने मंदिराकडे मार्गस्थ होईल. याची दत्तभक्तांनी दखल घ्यावी, असे आवाहन नवनाथ आरती मंडळाच्या प्रमुखांनी केले आहे.
महाआरतीने परिक्रमेची सांगता
दत्त परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जवळपास तीन तासांहून अधिकचा कालावधी लागतो. दत्त महाराजांच्या पालखीचे मंदिरात प्रस्थान झाल्यानंतर महाआरती होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर परिक्रमा सोहळ्याची सांगता होणार आहे.
शनिवारपासून यात्रेस प्रारंभ
चौल-भोवाळे येथील दत्तयात्रा शनिवार, दि. 14 ते बुधवार, दि. 18 डिसेंबर अशी पाच दिवस भरणार आहे. त्यानिमित्त शनिवार, दि. 7 डिसेंबरपासून दत्तमंदिरात अखंड हरिनामास प्रारंभ झाला असून, पंचक्रोशितील अठरा गावे या सप्ताहात सहभागी होत असतात.