खारघरमधील उद्यानांना अवकळा

नागरिकांसह बच्चेकंपनीचा हिरमोड

| पनवेल | वार्ताहर |

शाळेला उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे मुले-मुली खेळण्यासाठी उद्यान आणि मैदानाकडे धाव घेत आहेत. मात्र, बच्चेकंपनीसाठी असणारे खारघर वसाहतीमधील उद्यानातील झोपळ्यांवरील झोकेच गायब झाल्याने, तसेच खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याने उन्हाळी सुट्टीत विरंगुळा म्हणून उद्यानात येणाऱ्या नागरिकांसह बच्चेकंपनीचा हिरमोड होत आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्च करुन बनविलेल्या उद्यानांना सध्या देखभालीअभावी अवकळा आली आहे.


खारघर सेक्टर-20, शिल्प चौकशेजारील सेक्टर 21 मधील उद्यानातील खेळणी, घसरगुंडी, झोपाळा मोडकळीस आले आहेत. तसेच मैदानात मातीचे ढिगारे, खडी, अस्तव्यस्त पडून आहे. खारघर सेक्टर-2 मध्ये एकमेव शांतमय मैदान आहे. या मैदानात परिसरातील मुले-मुली खेळ खेळत असत. मात्र, सदर मैदानात महापालिकेकडून विकासकामे करताना खेळणी काढून टाकण्यात आली आहेत. मैदानात असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे दिवसा खारघर सेक्टर-2 मधील मैदानात मुले-मुली अश्लील चाळे करीत असल्याने लहान मुले-मुली आणि पालकांनी या मैदानाकडे पाठ फिरवली आहे.

सिडकोने खारघर सेक्टर-21 मधील सचिन तेंडुलकर मैदानालगत आणि वसाहतीलगत उद्यान असल्यामुळे या उद्यानात मुले-मुली आणि महिलांची संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील हिरवळ गायब झाली आहे. व्यायाम करण्यासाठी बसविलेले साहित्य तसेच मुलांना खेळण्यासाठी उभारलेला झोपाळा तुटून पडला आहे. घसरगुंडीलगत मोठमोठे खड्डे पडले आहेत. घोडागाडी निखळल्याने मुलाना खेळता येत नाही. उद्यानात उभारलेल्या अर्धवट अवस्थेतील व्यासपीठाच्या खोलीत प्रेमीयुगुलांचे चाळे सुरु असतात. तर काही मुले-मुली उद्यानात धूम्रपान करीत असतात. उद्यान असूनही उपयोग नाही. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे? असा प्रश्न परिसरातील रहिवाशांना पडला आहे. उद्यानलगत खेळण्यासाठी एकमेव मैदान होते. मात्र, सदर मैदानात कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारणीचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे खेळताना अडचण होत असल्याचे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी सांगितले.

पालकांमध्ये नाराजी
खारघर शहरात सिडकोने सेक्टरनिहाय उद्यान आणि मैदान उपलब्ध करुन दिले आहे. सदर उद्याने, मैदाने सडकोकडे असताना उद्यान आणि मैदानांची देखभाल केली जात होती. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडकोने खारघर शहरातील मैदाने आणि उद्याने महापालिकेकडे हस्तांतरीत केली आहेत. मात्र, महापालिकेकडून खारघरमधील बहुतांश उद्यान आणि मैदानात विकासकामे सुरु असल्यामुळे मातीचे ढिगारे, दगड, खडी मैदानात पडून आहे. सुट्टीत खेळण्यासाठी पुरेशी मैदाने आणि उद्याने नसल्यामुळे मुले-मुली आणि पालकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Exit mobile version