। कर्जत । प्रतिनिधी ।
तालुक्यातील गौरकामत परिसरातील प्रसिद्ध भिवगड किल्ल्याच्या डोंगराचा भाग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. पश्चिमेकडील मुख्य कड्यावरून सुमारे पंधरा ते वीस फुटांचा भाग खाली कोसळला असून, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डोंगररचनेची घसरण सुरू असल्याने घटना गंभीर मानली जाते.
भिवगड किल्ला हा शिवकालीन इतिहासाचा महत्वाचा वारसा मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर होत असल्याचे अनेक ऐतिहासिक नोंदींमध्ये आढळते. किल्ल्यावरील तटबंदीचे अवशेष व प्राचीन बांधकाम आजही दृश्य स्वरूपात असून, इतिहासप्रेमींसाठी हा किल्ला आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. सध्या या किल्ल्याभोवतालच्या बऱ्याच भागात लोकवस्ती नसली तरी किल्ल्याच्या उत्तर बाजूस आदिवासी वाडी असल्यामुळे या वस्तीला धोका वाढत असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
भिवगड अखंड संवर्धन समितीच्या माध्यमातून स्थानिक तरुण आणि इतिहासप्रेमी अनेक वर्षांपासून या किल्ल्याचे संवर्धन व स्वच्छता उपक्रम सातत्याने राबवत आहेत. किल्ल्याचे पुरातन अवशेष जपून ठेवण्यासाठी समिती वेळोवेळी प्रयत्न करत आली आहेत. मात्र, आता झालेल्या या नुकसानीने डोंगराची मजबुती कमी होत असल्याचे संकेत मिळत असल्याचे समिती सदस्य सांगत आहेत. भिवगड किल्ला हा केवळ कर्जत तालुक्याचा नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या इतिहासाचा अभिमान मानला जातो.
कर्जतमधील भिवगड किल्ल्याचा भाग कोसळला
