कार्यशिक्षणासाठी अंशकालीन निदेशक

Teacher with students around explaining or teaching from book on classroom - concept of support, education, assistance and guidance.

राज्यात 4 हजार 767 जणांना नेमणुकांचे आदेश

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची (सहावी ते आठवीच्या वर्गाची) पटसंख्या 100 पेक्षा जास्त आहे, त्याठिकाणी आता कला, शारीरिक शिक्षण व आरोग्य आणि कार्यशिक्षणासाठी अंशकालीन निदेशक नेमला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने राज्यात 4 हजार 767 जणांना नेमणुका देण्याचे आदेश काढले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्या सर्वांची नियुक्ती केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना कला शिक्षण, आरोग्य कार्यानुभव, क्रीडा याविषयाचे ज्ञान व्हावे, विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ राहावे, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून अंशकालीन निदेशक किंवा अतिथी निदेशक नेमण्याचा निर्णय यापूर्वी झाला आहे. पण, काही कारणांमुळे त्यांची सेवा खंडित करण्यात आली होती. यामुळे अनेकांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी अंशकालीन निदेशक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

दरमहा सात हजार रुपयांच्या मानधनावर अंशकालीन निदेशक नेमले जाणार असून, त्यांच्या नेमणुकांमुळे पुस्तकी ज्ञानाशिवाय कला, क्रीडा, कार्यानुभव, आरोग्य अशा विषयांवरील माहिती मिळणार आहे. पण, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या एक दिवस अगोदर हा निर्णय निघाल्याने त्या निदेशकांच्या नेमणुकांसाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

निवडणुकीनंतरच मिळणार नेमणुका
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी 14 ऑक्टोबरला अंशकालीन निदेशक, अतिथी निदेशकांना नेमणुका द्याव्यात, असे आदेश काढले. पण, दुसर्‍याच दिवशी आचारसंहिता लागू झाल्याने त्यांच्या नियुक्त्या आता निवडणुकीनंतरच दिल्या जाणार आहेत. तत्पूर्वी, आदेश निघाल्यापासून 45 दिवसांत पूर्वीपासून अंशकालीन निदेशक शाळांवर कार्यरत होते, त्याच शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीकडे अर्ज करावा.
Exit mobile version