पक्षनिष्ठ, तत्वांशी प्रामाणिक कार्यकर्ता ; आ. जयंत पाटील यांचे गौरवोद्गार

माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांच्या शोकसभेत
सर्वच पक्षांच्या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणारा, राजकीय मतभेद विसरून सर्वांनाच चोविस तास मदत करणारा, तत्व घेऊन चालणारा, स्वकर्तृत्वावर राजकारणात मोठी झोप घेत गरिबांसाठी झटणारा नेता म्हणजे अलिबाग-उरण विधानसभेचे माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर होत असे गौरवोद्गार शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी काढले.
अलिबाग पंचायत समिती तसेच अलिबाग नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने येथील पीएनपी नाट्यगृहात माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी ठाकूर यांच्या कार्याविषयी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी आ. जयंत पाटील यांच्यासह मधूकर ठाकूर यांचे सुपूत्र रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड प्रविण ठाकूर, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिप सदस्य भावना पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अ‍ॅड मानसी म्हात्रे, भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते, पतसंस्था महासंघाचे माजी अध्यक्ष गिरीश तुळपूळे, आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश मगर, शेकापचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटीलख् तालुका चिटणीस अनिल पाटील, काँग्रेसचे प्रदेश सदस्य हर्षल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे, जितेंद्र गोंधळी आदी उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी श्रद्धांजली वाहताना पुढे म्हटले की, व्यक्तीगत संपर्काच्या जोरावर मधुशेठ ठाकूर हे अलिबागचे आमदार झाले होते. वेगळी भुमीका आणि वेगळे तत्व घेऊन चालणारा कार्यकर्ता होता. त्यांचे जास्त शिक्षण झाले नसतानाही ते काँग्रेसचे आमदार झाले होते. शेकापमधून ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ट राहिले. त्यानंतर गर्भळीत झालेल्या काँग्रेसला नवसंजिवनी दिल्याने पक्ष उर्जितावस्थेत आल्याचेही पाटील म्हणाले. अलिबागचे आमदार नाना कुंठे, दत्ता पाटील, दत्ता खानविलकर, नारायण भगत यांच्या कामाप्रमाणेच मधूकर ठाकूर यांच्या कामाची नोंद करावी लागेल असे गौरवोद्गार आ. पाटील यांनी काढले. मधूकर ठाकूरांना पुण्य मिळाले असल्यानेच त्यांना वाढदिवसा दिवशी मरण आले. हे कोटींमध्ये असे भाग्यवंतांच्या नशिबी येते. हे गेले दहा वर्षे आजारी असल्याने त्यांच्या कुटुंबाने त्यांची मोठी सेवा केली. त्याबद्दल ठाकूर कुटुंबांचे त्यांनी यावेळी कौतूक करताना ठाकूर यांचे सामाजिक कार्य यापुढेही ठाकूर कुटुंबाने सुरुच ठेवावे असेही पाटील यांनी सुचविले. मधूकर ठाकूर यांची इच्छा त्यांचे सुपूत्र प्रविण ठाकूर यांनी पुर्ण करावी अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. मधूकर ठाकूर यांच्या सारखी माणसे इतिहास घडवतात अशक्य ते शक्य करुन दाखवतात असेही त्यांनी उद्गार काढीत मधूकर ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अलिबाग तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेश मगर यांनी श्रद्धांजली वाहताना कठीण परिस्थितीत ठाकूर यांनी स्वकर्तृत्वावर राजकारणात आणि समाजकारणात मजल मारीत 1990 च्या विधानसभेत आमदार म्हणून ते निवडून गेल्याचे सांगितले, तर राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे यांनी श्रद्धांजली वाहताना ठाकूर यांच्या वाढदिवशीच त्यांचे निधन झाल्याने मोठा धक्काच बसल्याचे सांगताना गरिबांसाठी झटणारा नेता गेल्याने सर्वसामान्य माणूस हळहळला गेल्याचे सांगितले.


गरिबीतही राजकीय इच्छा बाळगणारा, कठीण परिस्थितीत संघर्ष करीत तत्वाशी बेईमानी न करणारा आणि स्वकर्तृत्वावर लोकाशी संपर्क ठेवत विधानसभा गाठणारे मधुकर ठाकूर होते. त्यांना आपण गमावून बसलो असल्याने अलिबाग तालुक्यात त्यांच्याविना पोकळी निर्माण झाली आहे. अशी श्रद्धांजली भाजपाचे रायगडचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते यांनी यावेळी वाहिली.
रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी श्रद्धांजली वाहताना ठाकूर हे सर्वसामान्यांपैकी एक असतानाही जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ते उच्च पदापर्यंत पोचले होते. तसेच सर्वसामान्यांवर त्यांचे मनापासून प्रेम होते अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली, तर राकेश म्हात्रे यांनी श्रद्धांजली वाहताना आमदार झाल्यावरही ठाकूर यांनी मातीशी आपली नाल तुटू दिली नाही. गरिबांना भेडसावणार्‍या समस्यांसाठी ठाकूर यांच्या घराचा दरवाजा 24 तास उघडा असायचा. कठीण परिस्थितीत ते अधिक शिकू शकलेले नसले, तरी त्यांनी आपल्या सर्व मुलांना उच्चशिक्षित केल्याचे सांगितले.
रायगड जिल्हा परिषदेतील समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी श्रद्धांजली वाहताना ठाकूर यांनी विविध स्तरावर काम करताना सामाजिक बांधिलकी जपल्याचे सांगितले, तर ठाकूर यांची नात अपूर्वा ठाकूर यांनी आजोबांना माणसांच्या सहवासात राहण्याची सवय होती. आजोबा हे धनाचे नाही, तर मनाचे श्रीमंत होते असे सांगितले. ठाकूर यांचे मोठे सुपूत्र अ‍ॅड प्रविण ठाकूर यांनी शोकसभा कार्यक्रम आयोजित करणार्‍यांचे आभार मानताना पप्पा शेकापमध्ये असताना शेकापचे नेते प्रभाकर पाटील व वकील दत्ता पाटील यांच्या तालमीत तयार झाल्याचे सांगितले. कोणेतेही काम झालेच पाहिजे या मताचे पप्पा होते. यापुढेही पप्पांचे कार्य पुढे सुरूच ठेवत गोरगरिबांना ठाकूर कुटुंबियांतर्फे मदतीचा हात दिला जाईल असेही प्रविण ठाकूर यावेळी म्हणाले.

Exit mobile version