प्रवासी नौकेला अपघात  

 सुरक्षा यंत्रणांची तारांबळ

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड-जंजिरा पर्यटनात राजपूरी जेट्टी येथून जंजिरा किल्ल्‌‍याच्या दिशेने तीस प्रवाशांना घेऊन जाणारी नौका उलटून अपघात झाला आहे. त्यांना तातडीने वाचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा यंत्रणा पोहचवण्यात प्रत्येक कार्यालयात फोन खणाणताच सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाली. यावेळी अपघात स्थळी वेळेवर पोहोचताच मॉकड्रिल यशस्वी झाल्याचा प्रत्यय आला.

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (राजपूरी बंदरे समुह) प्रादेशिक बंदर अधिकारी. सी. जे. लेपांडे, मुरुडचे तहसीलदार रोहन शिंदे, पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांचे मार्गदर्शनानुसार राजपुरी जेट्टी येथून जंजिरा किल्ला येथे प्रवाशांना घेऊन जाणारी शिडाची नौका लक्ष्मी (R-J-ID-05-00221) हि प्रवासमार्गात पलटी होऊन दुर्घटना घडली. या बोटीतील 30 प्रवासी समुद्राच्या पाण्यात पडलेले आहेत. त्यांना वाचवण्याकरीता मदतीची आवश्यकता होती. अशा प्रसंगात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, राजपुरी बंदर व पोलीस विभाग, मुरुड पोलीस ठाणे यांचेमार्फत मॉक ड्रील आयोजीत करण्यात आले होते. सदर मॉक ड्रिलमध्ये तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयाचे कार्यालय प्रमुख/ कर्मचारी, मच्छिमार सोसायटी, कोळी बांधव, सागर रक्षक दल, लाईफ गार्ड व प्रवासी वाहतूक संस्था, रेस्कू बोट, पोलीस स्पीड बोट यांना मदतीसाठी सतर्क करण्यात आले. या सर्व यंत्रणा वेळेवर पोहचल्याने मॉकड्रिल यशस्वी झाल्याचा प्रत्यय आला.

Exit mobile version