तिकीट दरात 25 रुपये कपात
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण-भाऊचा धक्कादरम्यान 26 मेपासून पावसाळी हंगामात वाढविण्यात आलेल्या तिकीट दरात 1 सप्टेंबरपासून 25 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मागील तीन महिने पावसाळी हंगामात बंद करण्यात आलेली रेवस-भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील 1 सप्टेंबरपासून प्रवासी बोट सेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. ऐन गणपती सणातच तिकीट कपात आणि रेवस सागरी मार्गावरील सुरू होणार्या प्रवासी वाहतुकीमुळे अलिबाग-कोकणात जाणार्या हजारो भाविकांना दिलासा मिळणार असून, गैरसोय दूर होणार आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामात भाऊचा धक्का-उरण या मार्गावरील प्रवासी तिकिट दरात वाढ केली जाते. त्यामुळे 26 मेपासून भाऊचा धक्का-उरण या सागरी मार्गावरील तिकिट दरात 80 रुपयांवरुन 105 अशी 25 रुपयांनी वाढ केली होती. पावसाळी हंगामानंतर 1 सप्टेंबरपासून उन्हाळी हंगामासाठी तिकिट दरात 25 रुपये कपात करण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपासून या मार्गावरील तिकिट दर प्रौढांसाठी 80 तर लहानांसाठी 39 रुपये आकारण्यात येणार आहे.
जून ते 31 ऑगस्ट दरम्यान तीन महिन्यांसाठी या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतुक बंद ठेवण्यात आलेली प्रवासी बोट सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. हवामानाचा अंदाज घेऊन आणि जसजसी प्रवासी संख्येत वाढ होईल तशी लाँचेसच्या फेर्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव जमीर बामणे यांनी दिली.
ऐन गणपती सणातच 1 सप्टेंबर पासून भाऊचा धक्का -उरण सागरी मार्गावरील तिकिट दरात करण्यात आलेली 25 रुपयांची कपात आणि सुरू होणार्या रेवस – भाऊचा धक्का दरम्यानच्या प्रवासी लाँचेसमुळे अलिबाग-कोकणात जाणार्या हजारो भाविकांना दिलासा मिळणार आहे.