एसटी बसच्या समस्यांबाबत प्रवासी आक्रमक

बंद केलेल्या एसटी बस सेवा सुरू करण्यासह अन्य मागणीसाठी दिले निवेदन

| अलिबाग | प्रतिनिधी |

पुणे मार्गावर जाणारी शिवशाही बसचा बिघाड, अलिबाग ठाणेसह लांब पल्ल्यावरील बंद केलेल्या फेऱ्या अलिबाग-रेवदंडा मार्गावरील फेऱ्या बंद करणे अशा अनेक एस.टी समस्यांबाबत रायगड एसटी प्रेमी आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमवारी अलिबागचे आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन बंद केलेल्या एस.टी सेवा पुन्हा सुरू करण्याबरोबरच अन्य मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रायगड एस.टी प्रेमी संघटनेचे अमित कंटक, समीर रांजणकर उपस्थित होते.

अलिबाग – पुणे मार्गावर सुरू असलेली शिवशाही एसटी बसचा बिघाड कायमच रस्त्यात होतो.त्याबदलत्यात साधी बससेवा सुरू करण्याची मागणी एस.टी महामंडळ रायगड विभागाकडे करण्यात आली आहे. तरीदेखील प्रवाशांच्या हितासाठी कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. मागील सहा महिन्यांपासून रायगड एस.टी प्रेमी संघटना एस.टी महामंडळाकडे मागणीसाठी पाठपुरावा करीत आहे.

अलिबागहून रेवदंडा, मुरूडकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. संध्याकाळच्यावेळेला रेवदंडयाकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, सायंकाळी सहा ते रात्री आठच्या सुमारास कोणतीही सुचना न देता रेवदंडा मार्गावरील एसटी बस फेरी रद्द केली जाते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह महिला, कर्मचारी व इतर प्रवाशांना स्थानकात ताटकळत उभे राहवे लागते. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना होतो. याबाबत आगार व्यवस्थापक यांना अनेक वेळा सांगण्यात आले आहे. तरीदेखील त्यांच्याकडून कार्यवाही करण्यात आली नाही.

अलिबाग आगारातून यापुर्वी अलिबाग-ठाणे, अलिबाग-मुंबई, रेवदंडा-कल्याण, रेवदंडा-मुंबई, रेवदंडा-ठाणे, आग्राव -बोरीवली, सासवणे-बोरीवली, मांडवा-बोरीवली, रेवस-मुंबई, महाजने-परळ या एसटी बस सेवा सुरु होत्या. मुंबई, कल्याण, बोरीवली, ठाणेकडे जाणाऱ्या प्रवाशांना गेल्या 25 वर्षापासून या सेवेचा फायदा होत होता. परंतु अलिबाग-पनवेल ही विना थांबा सेवा सुरू केल्याने मुंबई, ठाणे, बोरीवली, परळ या मार्गावरील फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. विना थांबा सेवेचादेखील सावळा गोंधळ सुरू आहे. या बसेस वेळेवर लागत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अलिबागहून मुंबई, ठाणे, बोरीवलीकडे थेट जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे नियमीतपणे पुन्हा नव्याने लांब पल्ल्याच्या बसेस सूरू करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. अलिबाग-पनवेल विना थांबा या बस सेवेचे कोणतेही नियोजन व वेळापत्रक अलिबाग आगाराकडे नाही. त्यामुळे रायगड एस.टी प्रेमींनी एसटी महामंडळाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी संघटनेच्या वतीने अलिबाग एसटी बस आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

अलिबाग हे जिल्हयाचे ठिकाण आहे. प्रवाशांसह विद्यार्थी व कर्मचारी तसेच पर्यटकही एसटीतून प्रवास करण्यावर भर देतात. परंतु अलिबाग आगारातून योग्य नियोजन नसल्याचा त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे आगार व्यवस्थापकांसह विभाग नियंत्रक यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

समीर रांजणकर
रायगड एसटी प्रेमी


Exit mobile version