मोकाट गुरांबाबत प्रशासन उदासीन

प्रवासी, वाहनचालकांना सोसावा लागतोय त्रास

| कोर्लई | वार्ताहर |

गेल्या अनेक वर्षांपासून विशेष करून पावसाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात तसेच मुरुड तालुक्यात रस्त्यावर विविध ठिकाणी मोकाट गुरांच्या त्रासाने प्रवासी व वाहनचालक त्रस्त आहेत. यावर ठोस उपाययोजना करण्यात प्रशासनाची हतबलता, उदासीनता दिसून येत असल्याने जनमानसातून नाराजीचा सूर दिसून येत आहे.

नगरपरिषद, ग्रामपंचायतीत पूर्वी असलेली कोंडवाडा संकल्पना कालबाह्य झाल्याने जिल्ह्यात तसेच मुरुड तालुक्यात अनेक रस्त्यावर बर्‍याच ठिकाणी उनाड गुरांचा कळप, ठिय्या पाहावयास मिळतो. रस्त्यावर उनाड गुरांच्या त्रासाने दुचाकी, तीन चाकी वाहन चालकांना वेळप्रसंगी अपघाताला सामोरे जावे लागते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा व उपाययोजना ही काळाची गरज आहे.

यासाठी संबंधित नगरपरिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने जातीने लक्ष पुरवून रस्त्यांवरील उनाड गुरांच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक व जनमानसातून होत आहे.

Exit mobile version