आंबेवाडी नाका येथे चौपदरीकरणाचे काम अपूर्ण
| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुईपासून आंबेवाडी नाका येथे चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण असल्यामुळे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे तीन ते चार तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परिणामी, प्रवाशांचा खोळंबा होताना दिसत आहे.
सध्या वातावरणात प्रचंड गर्मी जाणवत असून, अंगाचा दाह कमी करण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे येथील चाकरमानी कोकणात हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिघी, रत्नागिरी तसेच गोवा येथील समुद्रकिनारी गर्दी करीत आहेत. याशिवाय शनिवार, (दि.25) ते रविवार, (दि.25) मे रोजी असणार्या सुट्ट्या व शाळा-कॉलेज यांना पडलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनाची संख्या अधिक वाढली आहे. यात भरीत भर आंबेवाडी नाक्यावरील काही दिवसांपूर्वी सुरु केलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे पुई गावाच्या हद्दीपासून दोन किलोमीटर अंतरावर आंबेवाडी नाक्यापर्यत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. भरउन्हाच्या झळा सहन करीत प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.
आंबेवाडी बाजारपेठेतील चौपदरीकरणाचे काम तसेच उड्डाण पुलाचे काम पंधरा वर्षांनंतर सुरु केले आहे. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. किती ठेकेदार आले नि किती गेले? रस्त्याचे काम काय मार्गी लागत नाही. महामार्ग पूर्ण होण्यासाठी लोकनेत्यांकडून फक्त तारीख पे तारीख; परंतु महामार्गाच्या कामात कोणतेही प्रगती नाही. काही दिवसांपूर्वी हे काम जूनपर्यंत पूर्ण होईल, असे लोकनेत्याकडून सांगण्यात आले. यामध्ये ठेकेदारावर प्रशासनाचा नसलेल्या वचक यामुळे फक्त मनमानी सुरु आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशीच परिस्थिती असून, या वाहतूक कोंडीमुळे तीन चार थांबून कोणाचा तरी नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे.