। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग-वडखळ मार्गावर कार्लेखिंड येथे वडखळला जाणार्या प्रवाशांसाठी बसस्थानक उभारण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. अलिबाग-वडखळ मार्गावरील कार्लेखिंड येथे वडखळ बाजूला जाताना एसटी बसचा महत्वाचा एसटी बस थांबा असल्याने याठिकाणी रेवस व मांडवा भागातील हजारोंच्या संख्येने प्रवाशी मुंबई, पुण्याकडे व इतर कोणत्याही ठिकाणी जाताना कार्लेखिंड येथील एसटी बस थांब्यावरूनच प्रवास करताना दिसतात.
मात्र, कार्लेखिंड याठिकाणी अलिबाग बाजूला जाणार्या प्रवाशांसाठी बसस्थानकाची काही वर्षांपूर्वी नवीन इमारत उभी केली आहे, हि इमारत गलिच्छ असून या ठिकाणी अनधिकृतपणे दुचाकी उभ्या केलेल्या असतात, यामुळे प्रवाशांना या बसस्थानकाचा उपयोग करण्यात अडचण येत आहे. शिवाय या बसस्थानकाचा वडखळ बाजूला जाणार्या प्रवाशांना कोणताही फायदा होत नाही, असे स्पष्ट दिसत आहे. कारण पलीकडच्या बाजूला उभे राहून अलिबागकडून अचानक सदर बस थांब्याजवळ आलेली बस पकडण्यासाठी रस्ता ओलांडून जावे लागते. यावेळी प्रवाशांना आपल्या सामानसुमानासह व कुटुंब कबिल्यासह अचानक रस्ता ओलांडून येताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी प्रवाशी पलीकडे न जाता याच बाजूला भर उन्हात तर कधी भर पावसात बसची वाट पाहत ताटकळत उभे असतात.
एसटी थांब्यावरून दररोज शाळेतील विद्यार्थी, आजारी रुग्ण, वयोवृद्ध, लहान मुले यांच्यासह प्रवास करणारे प्रवाशी यांना नाईलाजास्तव बसची वाट बघत ताटकळत उभे रहावे लागत असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, शिवाय याठिकाणी बसण्याची तरी सोडा निदान उभे राहण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने रस्त्यावर उभे राहावे लागत असल्याने अपघाताचा धोका देखील जास्त आहे. याबाबत प्रशासनाविरोधात प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यासाठी सरकारने व संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन कार्लेखिंड याठिकाणी वडखळ बाजूकडे जाणार्या बस थांब्यावर बसस्थानक उभारण्याची प्रवाशांनी मागणी जोर धरू लागली आहे.