बस थांब्या अभावी प्रवासी उन्हात: विद्यार्थी, महिला व आबालवृद्धांचे हाल

वाकण नाक्यावर शेड उभारण्याची मागणी
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
मुंबई- गोवा महामार्ग चौपदरीकरण कामादरम्यान रस्त्याच्या दुतर्फात असणारी मोठं मोठ्या झाडाची बेछूट कत्तल करण्यात आली. त्यामुळे वाटसरू यांची सावली हरपली. वाकण नाक्यावर प्रवासी शेड नसल्याने रणरणत्या उन्हात प्रवाशांची गैरसोय होत आहे. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे सावली देणारी मोठी झाडे तोडली असल्याने प्रवाशांना कोणताच आधार राहिलेला नाही. त्यामुळे येथे दोन्ही बाजूला प्रवासी शेड बांधण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर वाकण नाका हा महत्त्वाचा थांबा आहे. हा मार्ग पाली-खोपोली राज्य महामार्ग व तेथून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-बंगलोर महामार्गाला जोडतो. शिवाय पाटणूस व ताम्हिणी मार्गे पुणे मार्गालादेखील जोडतो. पालीसह इतरही गावांतील लोक, विद्यार्थी व चाकरमानी मुंबई, पनवेल, पेण, अलिबाग, रोहा, महाड व पोलादपूर आदी ठिकाणी जाण्यासाठी वाकण नाक्यावर उभे असतात. या मार्गाचे चौपदरीकरण झाले आहे.

महामार्गावर ठिकठिकाणी बस थांबे असणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हात वाहनाच्या प्रतीक्षेत तासन तास उभे राहून चक्कर येण्याचे प्रकार देखील पहावयास मिळतात. महामार्ग होण्याआधी रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या झाडांच्या सावलीखाली प्रवासी थांबत होते, परंतु चौपदरीकरणामुळे झाडे तोडण्यात आल्याने आता बस थांब्याअभावी जनतेचे हाल होतायेत.

वाकण नाका येथे उभे राहण्यासाठी प्रवासी शेड नसल्याने हाल होत आहेत. परिणामी महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रवासी शेड उभारली जावी. – राजू मोरे, शिक्षक

Exit mobile version