। कोलाड । वार्ताहर ।
ऐन दिवाळीत कोलाड नाक्यावरील एसटी कण्ट्रोलरला रोह्यात बोलविल्याने कोलाडकडे येणार्या एसटी बसेस कोलाड थांब्यावर थांबत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड हे बाजारपेठेचे मध्यस्थी ठिकाण असुन येथे मुंबई बाजूकडे, रत्नागिरी, गोवा, पुणे, रोहा व अलिबागकडे जाणार्या येणार्या प्रवाशांची संख्या जास्त असते. परंतु, लांब पल्ल्याच्या एसटी बसेस अगोदरच पुर्णपणे भरून येत असतात. यामुळे या एसटी बसेस कोलाड थांब्यावर थांबत नसल्याने येथील प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
तसेच, आंबेवाडी येथील बाजारपेठेतील मुख्य रस्ता उड्डाण पुलाच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून ये-जा करणारी वाहतूक बाह्यवळणावरून वळविण्यात आली आहे. यामुळे जुन्या जागी असणारा एसटी थांबा तोडण्यात आला असून तात्पुरता बाजारपेठेच्या पुढे बांधण्यात आला आहे. यामुळे नवीन येणार्या प्रवाशांना एसटी बससाठी कोठे उभे रहावे, हे लक्षात येत नाही. यामुळे येथील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.