निवारा शेडमधील पंखे बंद, कुत्र्यांचे वास्तव्य
| सुधागड-पाली | वार्ताहर |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीतील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. येथे बांधलेल्या तात्पुरत्या निवारा शेडमधील सर्व पंखे बंद आहेत. त्यामुळे रणरणत्या उन्हात प्रवाशांची लाहीलाही होते. याशिवाय येथे कुत्र्यांचा वावरदेखील आहे. परिणामी, प्रवाशांची गैरसोय होते.
साधारण तीन वर्षांपूर्वी पाली बसस्थानकाची जुनी धोकादायक इमारत तोडण्यात आली आहे. त्यावेळी स्थानक आवारात तात्पुरत्या स्वरूपाची निवारा शेड व स्वच्छतागृह बांधण्यात आले. निवारा शेड छोटी असल्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी अडचण होते. त्यात येथील चारही पंखे बंद आहेत. निवारा शेडचा सिमेंटचा पत्रा तापल्याने तेथे प्रचंड उष्णता वाढते. शिवाय, या ठिकाणी खाली जमिनीवर कुत्रे झोपून असतात. त्या ठिकाणी ते खड्डेदेखील पडतात, त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीला पारावर उरला नाही.
परिवहन महामंडळ अथवा कंत्राटदाराकडून नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीस व नूतनीकरणास अजूनही सुरुवात झालेली नाही. तसेच स्थानकाला खड्डे, जुन्या तोडलेल्या इमारतीचे डेब्रिज, उघडा नाला, दुर्गंधी आदी विविध समस्यांनी वेढले आहे. परिणामी, येथील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे शासन व लोकप्रतिनिधी कोणाचेही लक्ष नाही.