| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कर्जत मार्गासह इतर रेल्वे प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असली तरी त्याचा फटका दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे.
स्थानक परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे दिवसभर कर्कश आवाज होत असून, उडणाऱ्या धुळीमुळे वातावरण प्रदूषित झाले आहे. यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना अक्षरशः त्या पाण्यातून मार्ग काढत स्थानक गाठावे लागत आहे. सायंकाळच्या वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे दिसून येते. फेरीवाल्यांनी परिसरात अक्षरशः विळखा घातल्याने पादचारी मार्ग अडथळ्यांनी भरलेले असतात. सार्वजनिक बससेवा अपुरी पडत असल्याने प्रवाशांना दीर्घकाळ थांबावे लागत आहे. रिक्षाचालकांकडून मनमानीपणे भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर येत आहेत. तसेच, पार्किंगची समस्या गंभीर बनली असून, उपलब्ध पार्किंगसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एकीकडे विकासकामे सुरू असताना दुसरीकडे मूलभूत सोयींचा अभाव जाणवत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि प्रवाशांच्या सोयीसुविधा सुधाराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.






