। रसायनी । वार्ताहर ।
चौक ते मोरबे धरणाला जोडणारा रस्ता आणि त्या परिसरातील गावात जाणार्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या दुर्दशेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते मोरबे धरण यांना जोडणारा रस्ता असून या मार्गावर चौक नवीन वसाहत, नानिवली, नानिवली वाडी, नम्राची वाडी, मोरबे धरणग्रस्त वसाहती, मोरबे धरण प्रकल्प कार्यालय आणि गेल्या वर्षी 19 जुलै 2023 रोजी इरसाल वाडी दुर्घटना घडली, त्या गावचे पुनर्वसन याच मार्गावर होत आहे.
चौक नवीन वसाहत येथे पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावर मोठा पुल आहे. याच पुलाखालून सर्व वाहतूक होत असते, मोरबे धरणाकडे जाताना पुलाची हद्द संपल्यावर रेल्वे मार्गाचे काम करणार्या यंत्रणेचे गोडाऊन आहे आणि इथूनच सर्व कामकाज चालते. ठिकाणाहून रेल्वे मार्गासाठी लागणारे साहित्य पुरवले जाते. त्यामुळे अवजड वाहने, मिक्सर, पोकलन, जेसीबी यांची ये-जा होत असते. या अवजड वाहनांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे, असे स्थानिकांनी सांगितले.
अद्याप पावसाळा झाला नाही, तरीही या पुलाखाली पाणी साठते आहे, रस्त्याची चाळण झाल्याने दुचाकीचालक अनेकवेळा पडून जखमी झाले आहेत. लहान विद्यार्थी यांची ने-आण करतांना अतिशय धोका पत्करावा लागतो. समोरासमोर दोन गाड्या आल्यास खूपच त्रासदायक ठरत आहे. विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूला अवघड वळणे आहेत. समोरासमोर दिसत नसल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, असे काही तरुणांनी सांगितले. यामुळे रेल्वे प्रशासन यांनी रस्ता दुरूस्ती करावी असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे, अन्यथा आवाहनचे आव्हानात रूपांतर होईल, अशी तिखट प्रतिक्रिया तरुणांनी दिली.