| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सातगाव माध्यमिक विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालय परिसर देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला होता.कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची, पराक्रमाची तसेच स्वराज्य स्थापनेतील त्यांच्या योगदानाची माहिती उपस्थितांसमोर मांडली.
विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर करून वातावरण शिवमय केले. त्यांच्या सादरीकरणातून शिवाजी महाराजांचे शौर्य, धैर्य आणि न्यायप्रियता अधोरेखित झाली. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.







