पावणे चार किलो वजनाचे बाळ जन्माला

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चक्क एका पावणे चार किलो वजनाच्या बाळाचा जन्म झाला. तेथे प्रसूती साठी आलेल्या आदिवासी गरोदर मातेचे यशस्वी बाळंतपण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी केल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत मधील वडाचीवाडी येथील सुनीता हिलम या गरोदर महिला बाळंतपणासाठी कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 26 मे रोजी दाखल झाल्या.कर्जत तालुक्यातील असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासनाचे कर्जत उपजिल्हा रूग्णालय तसेच कशेळे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी बाळंतपणासाठी गरीब आणि सर्वसाधारण लोक देखील जायचा कचरतात.त्या सर्व ठिकाणी बाळंतपणासाठी पोहचलेल्या गरोदर माता यांना या ठिकाणी बाळंतपण होणार नाही तुम्ही पुढे जा असे नेहमी सांगीतले जाते.त्यामुळे आपल्याला देखील खासगी दवाखान्यात पाठवले जाईल या भीतीने आधीच घाबरलेले हिलम दांपत्य कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचले.तेथे प्रसूती तज्ञ डॉ. ममता गजबे यांनी कडाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ भांबेरे आणि विकास कटार यांच्या मार्गद्शनाखाली आरोग्यसेविका प्रतिभा शिर्के,नलावडे तसेच आरोग्य मदतनीस साळुंके यांनी हिलम यांचे बाळंतपण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. गरोदर मातेच्या पोटातील बाळाचे वजन खुप जास्त असल्याने बाळंतपण करताना शर्थीचे प्रयत्न वैद्यकीय पथकाला करावे लागले. बाळंतपण यशस्वी झाल्यानंतर बाळाचे वजन तीन किलो आठशे ग्रॅम भरल्याचे पाहून काही क्षण बाळंतपण करणार्‍या आरोग्य पथकाला देखील काही क्षण हायसे वाटले तर गरोदर माता सुनीता हिलम यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्यांनी सरकारी दवाखान्यात असे अवघड बाळंतपण झाले याबद्दल सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक होत आहे.

कर्जत तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात सहज होणारे नैसर्गिक बाळंतपण सोडले तर जबाबदारी घेण्यास कोणी तयार नसते.कशेले ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करून बाळंतपण केले जात नाही तर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ नाहीत.यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये बाळंतपण करून घेण्यासाठी गरीब तसेच आदिवासी लोकांना जावे लागते.मात्र वडाचीवाडी येथील आदिवासी महिलेच्या गर्भातील तब्बल पावणे चार किलो वजनाचे बाळाचे झालेला जन्म झाला आहे.ही बाब कर्जत तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी दिलासादायक असल्याची प्रतिक्रिया कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी दिली आहे.

Exit mobile version