पंचायत समितीच्या प्रांगणातील पेव्हर ब्लॉक गायब

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

तालुका पंचायत समितीमध्ये प्रशासकाचा कार्यकाळ सुरू असून 6 वर्षांपूर्वी या पंचायत समितीमध्ये सत्तेत आलेल्या राज्यकर्त्यांच्या काळामध्ये पोलादपूर पंचायत समितीच्या प्रांगणातील पेव्हर ब्लॉक गायब होण्याची घटना प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्या संगनमताने घडली होती.

पोलादपूर शहरातील आनंदनगरच्या काँक्रीट रस्त्याला फोडून नव्याने बांधण्याची कामे गेल्या वर्षांमध्ये झाल्यानंतर आनंदनगरसह काही भागातील काँक्रीट रस्ते फोडून तेथील काँक्रीटचा मलबा डम्परमध्ये भरून काही इमारतींच्या पायाचा भराव करण्यासाठी वापरण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. पोलादपूर पंचायत समितीच्या प्रांगणामध्येही चक्क एका विकासकामाची चोरी करण्यात आल्याची चर्चा असून पंचायत समितीच्या कार्यालयासह बॅ.नाथ पै सभागृहाच्या प्रांगणात बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक्स रातोरात काढून नेल्याची घटना होऊनही अद्याप प्रशासनाला कार्यवाही करण्याची गरज वाटत नसल्याचे दिसून येत आहे.

पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर हे पेव्हर ब्लॉक्स पंचायत समितीने भाडयाने आणलेले अथवा विकास कामे केल्याचे कागदोपत्री दाखवून बिले काढून झाल्यानंतर पुन्हा मटेरियल सप्लायरला परत केले होते. याबाबत कोणीही अधिकृतपणे माहिती देऊ शकत नसल्याचे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलादपूर तालुक्यात अनेक पाणी योजना, अनेक गावांतील शाळा सुधार निधीतून करायची कामे, तसेच अंतर्गत काँक्रीटीकरणाचे रस्ते आणि 14 व 15 व्या वित्त आयोगासह ग्रामनिधितील विकास कामांची मोठया प्रमाणात चोरी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय राजवटीला या चोऱ्यांकडे गांभिर्याने पाहावेसे वाटत नसल्याने पोलादपूर तालुका उर्वरित 21 ग्रामपंचायतीच्या आणि 4 पंचायत समितीच्या निवडणूकांसह जिल्हा परिषदेच्या 2 जागांसाठी रणधुमाळीला या भ्रष्टाचाराच्या मोठया भांडवलासह सामोरे जाणार असल्याची चर्चा होत आहे.

Exit mobile version