चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो

। बारामती । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तिसर्‍या टप्प्यांतील 11 जागांवर मंगळवारी (दि.7) मतदान होणार आहे. या अकरा जागांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. दरम्यान, तिसर्‍या टप्प्यातील जागांवरील प्रचाराच्या तोफा 5 मे रोजी सायंकाळी थंडावल्या. त्यापूर्वी बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची प्रचाराची सांगता सभा बारामतीत पार पडली. दरम्यान, या सांगता सभेला तरुणांपासून वृद्धांपर्यंत आणि तरुणींपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी जोरदार प्रतिसाद दिला. या सर्व घडामोडीत एक तरुण सर्वांचे लक्ष वेधत होता. या तरुणाच्या हातात फलक धरलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बारामतीतील या सभेला शरद पवार यांचे आगमन होण्यापूर्वी या तरुणाने सभेच्या ठिकाणी एक फलक झळकावला. ज्यावर लिहिले होते, ‘चहावाल्याच दुकान फक्त साखरवला बंद करू शकतो…’ या फलकातून तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोला लावला. कारण पंतप्रधान मोदी यांनी 2014 च्या लोकसभेच्या प्रचारात, त्यांनी लहाणपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकला असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे शरद पवार हे देशातील सहकार क्षेत्रातील दिग्गज मानले जातात. आपल्या कारकिर्दीत पवारांनी अनेक साखर कारखाने चालवले आहेत. त्यामुळेच या फलकातून तो झळकवणार्‍या तरुणाला, ‘पवार मोदींचे दुकाण बंद पाडणार,’ असे म्हणायचे असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

Exit mobile version