कृषीपंप वीजबिलांची 50 टक्के थकबाकी भरा, कर्जमाफी मिळवा


महावितरणचे शेतकर्‍यांना आवाहन
मुंबई | प्रतिनिधी |
राज्य शासनाच्या कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 मधून वर्षानुवर्ष थकबाकीमध्ये असलेल्या कृषिपंपांचे वीजबिल कोरे करण्याची संधी शेतकर्‍यांना मिळाली आहे. थकबाकीच्या योजनेनुसार महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीचे 15 हजार 96 कोटी 66 लाख रुपये माफ करण्यात आले आहे. आता चालू वीजबिल आणि येत्या मार्च 2022 पर्यंत सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास राज्यातील 44 लाख 50 हजार शेतकर्‍यांना तब्बल 15 हजार 353 कोटी 88 लाख रुपयांची आणखी माफी मिळणार आहे. सोबतच थकीत वीजबिल देखील कोरे होणार आहे.
ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या कृषीपंप वीजजोडणी धोरणातून वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे 66 टक्के सूट देण्यात येत आहे. राज्यातील 44 लाख 50 हजार 828 शेतकर्‍यांकडे सप्टेंबर 2020पर्यंत 45 हजार 804 कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. यात महावितरणने निर्लेखित केलेले 10 हजार 420 कोटी 65 लाख आणि विलंब आकार व व्याजामधून 4 हजार 676 कोटी 1 लाख रुपयांची सूट अशी एकूण 15 हजार 96 कोटी 66 लाखांची रक्कम माफ करण्यात आली आहे. सोबतच वीजबिलांच्या दुरुस्तीमधून 266 कोटी 67 लाख रुपयांची रक्कम समायोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडे आता 30 हजार 441 कोटी 75 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. थकबाकीदार शेतकर्‍यांनी चालू वीजबिल तसेच येत्या मार्च 2022 पर्यंत थकबाकीची 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित 50 टक्के म्हणजे 15 हजार 353 कोटी 88 लाख रुपये माफ होणार आहेत. या संधीचा लाभ घेतल्यास राज्यातील शेतकर्‍यांना वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी एकूण 30 हजार 450 कोटी 56 लाख रुपयांची माफी मिळणार आहे.
3 लाख 50 हजार शेतकर्‍यांचे वीजबिल कोरे – योजनेचा लाभ घेत राज्यातील 3 लाख 50 हजार 338 शेतकर्‍यांनी वीजबिल कोरे केले आहे. या शेतकर्‍यांकडे 1020 कोटी 65 लाखांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी चालू वीजबिलांचे 184 कोटी 92 लाख रुपये तसेच 50 टक्के थकबाकी म्हणजे 510 कोटी 42 लाख रुपयांचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. या शेतकर्‍यांना थकबाकीचे उर्वरित 50 टक्के म्हणजे 510 कोटी 43 लाख रुपयांची माफी मिळाली आहे. या योजनेतून पुणे प्रादेशिक विभागातील 1 लाख 84 हजार 531, कोकण प्रादेशिक विभाग- 98 हजार 456, नागपूर प्रादेशिक विभाग- 52 हजार 513 आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील 14 हजार 837 शेतकरी वीजबिलांमधून पूर्णतः थकबाकीमुक्त झाले आहेत.

Exit mobile version