शेकापचे प्रकाश म्हात्रे यांची सरकारकडे मागणी
| चाणजे | वार्ताहर |
राज्य सरकारने तिसर्या मुंबईच्या निर्मितीसाठी ठाणे जिल्ह्यातील बेलापूर विभागातील तसेच पनवेल, उरण तालुक्यातील 95 गावांतील शेतकर्यांच्या भाताचे विपुल पीक येणार्या जमिनी एकरी 27 हजार रुपये किमत देऊन कवडीमोल दराने घेतल्या आहेत. आम्हा भुमीपुत्रांचा विरोध हा विकासाला नाही तर विकासाच्या नावाखाली भूमीपुत्रांना बेरोजगार करून त्यांना देशोधडीला लावू त्यांचे येथील अस्तित्वच नष्ट करणे या गोष्टींना विरोध आहे. तरी, आमच्या जमिनींना एकरी पन्नास कोटी भाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य प्रकाश म्हात्रे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
ते पुढे म्हणाले की, येथील आगरी, कोळी, कराडी या भूमीपुत्रांना देशोधडीला लावून त्यांचे येथील अस्तित्वच धोक्यात आणले आहे आणि आता तर खोपटा नवेनगर व कर्नाळा-साई-चिरनेर या नावाने तिसरी मुंबई निर्माण करून येथील भूमीपुत्रांना देशोधडीला लावून त्यांचे येथील अस्तित्वच नष्ट होण्याची भीती शेकापचे जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. आम्हा भूमीपुत्रांचा विरोध हा विकासाला नाही तर विकासाच्या नावाखाली भूमीपुत्रांना बेरोजगार करून त्यांना देशोधडीला लावू त्यांचे येथील अस्तित्वच नष्ट करणे या गोष्टींना विरोध आहे.
काय आहेत मागण्या?
शासनाने नियोजित प्रकल्पासाठी येथील भूमीपुत्रांच्या जमिनी संपादन करताना एक एकराला 50 कोटी रुपये किंमत द्यावी. साडेबारा टक्के विकसित भूखंड द्यावा, शेतकरी असल्याचा दाखला द्यावा, प्रकल्पबाधित प्रत्येकास नोकरी, रोजगार द्यावा, पुढे वारसाहक्काने एकास नोकरी द्यावी, प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांचे सुयोग्य असे प्रकल्प परिसरातच पुनर्वसन, भूमीहीन शेतकरी, शेतमजूर यांना विकसित भूखंड, रोजगार व पुनर्वसन करणे, शेतकरी वंशपरंपरेने पिकवित असलेल्या जमिनी सरकार संपादित करीत असेल तर शेतकरी भूमीपुत्रांचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही याची दक्षता मायबाप सरकारने घ्यावी, अशी मागणी प्रकाश म्हात्रे यांनी सरकारकडे केली आहे.







