रेडी रेकनरच्या चारपट भाव जमिनीला द्या, अन्यथा आंदोलन

मागण्या मंजूर करा, मगच रेल्वे आणा
माजी आमदार पंडित पाटील यांचा इशारा

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील आगरदांडा बंदर विकासाचे काम जोरदार सुरू आहे. लवकरच या भागात रेल्वे येणार आहे. रेल्वेसाठी रोहा व मुरुड तालुक्यातील जमिनी हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सजग राहावे, ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना रेडी रेकनरच्या चारपट भाव जमिनीला मिळालाच पाहिजे, तरच जमिनी रेल्वेसाठी देण्यात येतील. अन्यथा आंदोलन अटळ असेल, असा इशारा माजी आमदार पंडित पाटील यांनी दिला आहे.

सावली ग्रामपंचायतीमधील टोकेखार भागात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. त्याच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमानिमित्त ते येथे आले होते. पेव्हर ब्लॉक लोकार्पण शेतकरी कामगार पक्षाचे मुरुड तालुका चिटणीस अजित कासार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी गणपत बेडेकर, भरत महादन, मनोहर माळी, विठ्ठल माळी, शरद चवरकर, विकास दिवेकर, श्रीकांत वारगे, राहील कडू, इम्तियाज मलबारी, रमेश दिवेकर, धर्मा हिरवे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

दिघी बंदराचा विकास होत आहे. आपल्या मुलांना नोकरी व रोजगार मिळण्यासाठी आगरदांडा सावली व आजूबाजूच्या गावातील लोकांनी एक कमिटी गठित करा. या कमिटीने दिघी प्रशासनाशी चर्चा करून आपल्या मागण्या मंजूर करून घ्या. लोकांनी एकत्र या, लढा द्या, आपल्या मागण्या मंजूर होणारच, असा विश्वास पंडित पाटील यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी आदानींचे विश्वासू आहेत.त्यामुळे लोकांना न्याय मिळेल की नाही यात शंका निर्माण झाली आहे. लोकांच्या मागण्या मंजूर करा, मगच रेल्वे आणा, अशी आग्रही भूमिका यावेळी पाटील यांनी मांडली.

यावेळी तालुका चिटणीस अजित कासार यांनी सांगितले की, माजी आमदार पंडित पाटील यांच्यामुळे सावली भागातील विकासकामांना चालना मिळत आहे.लोकांनी काम करणाऱ्या व्यक्तीसोबत राहून आपला विकास करावा. कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामास लागावे. या कार्यक्रमासाठी टोकेखार येथील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकता येत नाही. सर्वप्रथम लोकांचा विश्वास जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. लोकांना जे आवश्यक आहे, ते दिले तरच लोकप्रतिनिधी म्हणून सक्षम असल्याचा दाखला मिळेल.

माजी आ. पंडित पाटील
Exit mobile version