जास्त पैसे भरा आणि ‘ड्राय डे’च्या दिवशी पण दारू मिळवा

। उरण । वार्ताहर ।
राज्यात ‘ड्राय डे’ असला तरी उरणमध्ये दारूची विक्री होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. इतर दिवसापेक्षा ‘ड्राय डे’ च्या दिवशी जास्त धंदा होत असल्याचे दारू विक्रेते सांगतात. मात्र त्यांच्यावर उत्पादन शुल्क अथवा पोलिसांकडून कारवाई झाल्याचे दिसत नाही. आज आषाढी एकादशी निमित्त ड्राय डे असतानाही उरणमधील वाईन शॉप, बार व बियर शॉपमधून दारूची विक्री होत असल्याचे चित्र पहावयास मिळेल.

कोव्हीड काळात राज्यात दारूची विक्री बंद असताना उरणमधील वाईन शॉप मधून चढत्या भावाने दारूची विक्री होत होती. त्यामध्ये बनावट दारूची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे समजते. तसेच उरणमधील बार हे वेळेच्या मर्यादेपेक्षा अधिक वेळेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे मध्यरात्री अनेकवेळा बोलाचाली होत असते. यामुळे शेजारील इमारतीमधील रहिवाशांची झोपमोड होत असते. याची त्यांनी अनेकवेळा तक्रारी करूनही सदर बारमालकांवर काडीचा फरक पडलेला दिसत नाही. सदर बार हा रेसिडेंडलमध्ये बिनधास्तपणे सुरू आहे.

उरणमधील वाईन शॉपमधून तालुक्यातील अनेक गावोगावी खासगी वाहनातून घरपोच दारूचा माल पोहचविला जात आहे. उरण परिसरातील जेएनपीटी, द्रोणागिरी व तालुक्यातील इतर ठिकाणी असलेल्या छोट्या मोठ्या कंटिंगमध्ये मद्यपान करण्यास मनाई असताना देखील परिसरातील कंटिंगवर मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जात आहे. विशेष म्हणजे कंटिंग चालकच मद्य पुरवठा करताना दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदेशिर धंदे करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Exit mobile version