पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे द्या; केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांना निवेदन

। नेरळ । वार्ताहर ।
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना किमान पाच लाख रुपये देण्यात यावेत, या मागणीसाठी पेण बँक संघर्ष समितीचे सुनील गोगटे यांनी नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय अर्थ विभागाकडे मागणी केली आहे. गेली 12 वर्षे पेण बँकेच्या ठेवीदारांचा आपल्या हक्काच्या पैशासाठी लढा सुरु असून, बँकेच्या ठेवीदारांना मुदत ठेव मिळावी, या मागणीसाठी संघर्ष समितीचे सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भास्कर कराड यांची भेट घेतली.

12 वर्षांपासून दीड लाख पेण को ऑप बँक ठेवीदारांचे पैसे अडकून आहेत. अनेक ठेवीदार 75 वर्षांवरील झाले असून, त्यांच्या ठेवीवरील व्याजावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असायचा. परंतु, बँक बुडीत निघाल्यापासून त्यांची अवस्था फार वाईट आहे. अनेक ठेवीदार बँक बुडाल्याच्या धक्क्याने मृत्युमुखीदेखील पडले आहेत. त्यामुळे पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या वतीने अनेक वर्षे लढा सुरु आहे. मोलमजुरी करून भविष्यासाठी जमा केलेल्या पुंजीवर विश्‍वस्त मंडळाने डल्ला मारला असून, सामान्य ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली आहे, त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या मुदत ठेवी मिळाव्यात यासाठी केंद्रीय अर्थ विभागाने मध्यस्थी करावी, अशी मागणी सुनील गोगटे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भास्कर कराड यांची भेट घेऊन केली आहे. त्यावेळी सर्वेश गोगटे, अक्षय सर्वगोड, राहुल मसणे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकार सकारात्मक
दुसरीकड पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी भारत सरकारचा अर्थ विभाग सकारात्मक आहे आणि त्यामुळे आपण लवकरच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी बोलून रिझर्व्ह बँकेला काय सांगता येईल काय? यासाठी विचार विनिमय करणार असल्याचा शब्द भास्कर कराड यांनी पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना दिला.

Exit mobile version