उरणकरांनी काळजी घ्यावी; डॉ. बी.एम. कालेल यांचे आवाहन

| उरण | वार्ताहर |
सध्या देशात एच 3, एन 2 चा प्रादुर्भाव काही अंशी दिसून येत आहे. उरणमध्ये या विषाणुचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता खोकला, सर्दी, ताप या आजारांवर तात्काळ उपचार करुन घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे, तसेच औषधोपचार करुन घेणे गरजेचे आहे, असे आवाहन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एम. कालेल यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की, उरण तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम हे उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी करीत आहेत. वातावरणातील बदलामुळे काही नागरिकांना सर्दी, खोकला, ताप या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. तरी नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे गरजेचे आहे.

काहींना काही दिवस खोकल्याचा त्रास जास्त जाणवत असल्यास त्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून तोंडावर माक्सचा वापर करावा तसेच वेळच्या वेळी औषधोपचार करावेत, आपले हात स्वच्छ धुवावेत तसेच परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता शासनाच्या आदेशाचे डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक आहे, असे शेवटी डॉ. कालेल यांनी सांगितले.

Exit mobile version