कर्जतमधील दहा तलाव कोरडे; पिण्याच्या पाण्याच्या समस्या वाढल्या
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात पाणी जमिनीत मुरावे आणि पाण्याची भूजल क्षमता वाढावी यासाठी पाझर तलाव बांधण्यात आले आहेत. तालुक्यात 1978 ते 1985 या काळात बांधण्यात आलेल्या सर्व दहा पाझर तलावांमधील पाण्याने तळ गाठले आहे. तालुक्यातील पाणी टंचाई वाढली असून शासनाचे टँकर वाडी वस्त्यांवर जाऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहेत. दरम्यान, कर्जत तालुक्याची पाण्याची तहान भागविण्यासाठी शासनाने कामतपाडा, ओलमन, देवपाडा, वारे येथील साईटवर पाझर तलावांची उभारणी करावी अशी मागणी पुढे येत आहे.
कजर्र्त तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभागाचे वतीने पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी पाझर तलावांची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 1978 पासून 1195 पर्यंत दहा ठिकाणी पाझर तलावांची निर्मिती झाली. त्यानंतर शासन कडून मागील 30 वर्षात एकही नवीन पाझर तलाव बांधला नाही. त्यात नऊ तलावांपैकी दोन तलावांची दुरुस्ती यापूर्वी झाली होती आणि आता आणखी दोन तलावांची दुरुस्ती सुरु आहे. त्यामुळे अनेक वर्षे दुरुस्ती न झाल्याने कर्जत तालुक्यातील पाझर तलाव हे गाळाने भरले आहेत.
त्यामुळे तेथील पाण्याची साठवण क्षमता देखील कमी झाली आहे. डोंगरपाडा पाझर तलाव फुटला होता तर खांडस, आर्डे आणि कशेळे येथील पाझर तलाव मातीने भरले असल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. यावर्षी तालुक्यातील गावंडवाडी आणि अंभेरपाडा येथील पाझर तलावांची दुरुस्ती कामे सुरु असल्याने सध्या त्या पाझर तलावात पाणी आता शून्यावर गेला आहे. सध्या तालुक्यातील खंडापे येथील पाझर तलावामध्ये 20 टक्के पाणी साथ आहे. तर बळीवारे, वरई, डोंगरपाडा येथील पाझर तलावांमध्ये जेमतेम 10 टक्के पाणीसाठा आहे. आर्डे, खांडस आणि कशेळे येथील पाझर तलावात जेमतेम 5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. या सर्व पाझर तलावातील पाणी पाझरून हे खालील भागात जाते. मात्र पाझर तलाव आटल्याने त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या खालील भागातील नळपाणी योजना यांचा पाण्याचा पुरवठा बंद झाले आहे. त्यामुळे पाण्याच्या पाण्याची टंचाई वाढली.तालुक्यात 1995 नंतर एकही पाझर तलावाची निर्मिती झाली नाही. त्यामुळे तालुक्यात कामतपाडा, वारे, देवपाडा, ओलमन, बेडीसगाव आदी ठिकाणी पाझर तलाव नव्याने बांधण्याची कार्यवाही व्हावी अशी मागणी होत आहे.
पाझर तलावातील पाण्याची
स्थिती (द.ल.घ.मी.)
तलाव | एकूण क्षमता | सध्याची स्थिती |
खांडपे | 642 | 128 |
बलीवरे | 351 | 70 |
कशेळे | 187 | 40 |
वरई | 671 | 120 |
अंभेरपाडा | 40 | 00 |
खांडस | 184 | 40 |
डोंगरपाडा | 368 | 70 |
जामरुंग | 450 | 70 |
गावंडवाडी | 580 | 120 |
आर्डे | 75 | 20 |