| माणगाव | वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर कशेने गावच्या हद्दीत न्यू सुग्राम हॉटेलजवळ भरधाव कारच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.10) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणगावपासून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कशेने गावच्या हद्दीत न्यू सुग्राम हॉटेलजवळ हा अपघात घडला. रविवारी (दि.10) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास चेतन तानाजी सावरटकर व राजेश नथुराम पिरदनकर (42) रा.कशेने, ता.माणगाव हे दोघे शतपावले करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग रस्त्याच्याकडेने चालत होते. दरम्यान, मुंबईकडून माणगावकडे जाणाऱ्या भरधाव कारने राजेश पिरदनकर यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यात राजेश पिरदनकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला.
या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, याप्रकरणी अधिक तपास माणगाव पोलीस करत आहेत.