| मुंबई | प्रतिनिधी |
दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश शहा (40) असे या पादचाऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार फरार झाला असून, सांताक्रूझ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शहा, पत्नी आणि तीन मुलांसह सांताक्रूझ येथे वास्तव्यास होते. ते शुक्रवारी (दि.1) रोजी सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास ते जुहू तारा रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयासमोरून रस्ता ओलांडत असताना जुहू कोळीवाड्याच्या दिशेने पश्चिम वाहिनीवरून भरधाव वेगाने आलेल्या एका मोटारसायकलने त्याला धडक दिली. या अपघातात गणेश जखमी झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार फरार झाला. शहा याची पत्नी आणि नातेवाईकांनी त्यांना तात्काळ कूपर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी त्याला परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, तोपर्यंत दुपारचे तीन वाजले होते. त्यामुळे कुटुंबियांनी त्याला दुसऱ्या दिवशी केईएममध्ये नेण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी सायंकाळी सहा वाजता शहा यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, (दि.2) ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. गणेश शहा हे नळ दुरूस्तीचे (प्लंबर) काम करीत होते. सांताक्रुझ पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंदवला आहे. फरार दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे.






