पेणच्या बंटी-बबलीचा तुरुंगातील मुक्काम आणखी 4 दिवस वाढला

प्रवीणा सावंत व साथीदाराला 16 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
पेण पोलिसांकडून दोन्ही आरोपींची संपूर्ण मालमत्ता व सर्व बँक अकाउंट गोठवण्याची शक्यता?
| पेण | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील असंख्य तरुण-तरुणींना फसविणाऱ्या पेणच्या बंटी-बबली या जोडीचा पेण पोलीस स्टेशनच्या तुरुंगातील मुक्काम आणखी 4 दिवस वाढला आहे. जेएसडब्ल्यू कंपनीत नोकरी देण्याचे तसेच याच कंपनीत भंगार ठेका मिळवून देण्याचा खोटा बनाव करुन आत्तापर्यंत जिल्ह्यातील 43 तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अल्पावधीतच बंटी-बबली म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या प्रवीणा सावंत व अतुल मांडवकर या गोळजोडीची संपूर्ण मालमत्ता व सर्व बँकेतील अकाउंट गोठविणे, या कटातील आणखी आरोपींचा शोध घेणे व या केस संदर्भात अधिक तपास करण्यासाठी पेण न्यायालयाने 16 जुलै पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लाईन आळी,पनवेल येथील फिर्यादी अजय पाटील यांनी पेण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार, डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीत भंगारचा ठेका व विविध विभागात वेगवेगळ्या नोकऱ्या मिळवून देतो असा खोटा बनाव करून एका राजकीय पक्षाची स्वयंघोषित नेत्या प्रविणा सावंत ( रा.गुरुकृपा सेासायटी,पेण) तसेच तिचा पेण येथील साथीदार अतुल मांडवकर या आरोपी गोळजोडीने जिल्ह्यातील 43 तरुणांकडून प्रत्येकी 30 हजार ते 1 लाख 20 हजार रुपये पर्यंत घेऊन 31 लाख 79 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

सदर फसवणुकीच्या गुन्ह्याचा सखोल तपास करताना पेण पोलिसांना नवनवीन धक्कादायक माहिती मिळत आहे. त्यामुळे सदर आरोपींसोबत आणखी महिला-पुरुष साथीदार असल्याचा संशय ही पोलिसांना येत आहे. त्यामुळे या बंटी-बबली जोडीची संपूर्ण मालमत्ता जप्त करणे, त्याचबरोबर सर्व बँकेतील अकाउंट गोठविणे, या फसवणुकीच्या कटातील आणखी आरोपींचा शोध घेणे व या गुन्ह्याच्या खोलवर जाऊन अधिक तपास करण्यासाठी सदर आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता या आरोपी जोडगोळीला 16 जुलै पर्यंतची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या आदेशानुसार व पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.टी.काळे व पोलीस कर्मचारी हे अधिक तपास करीत आहेत.

या फसवणूक प्रकरणातील दोन्ही आरोपींची संपूर्ण मालमत्ता व सर्व बँक अकाउंट न्यायालयाच्या आदेशानुसार पेण पोलिसांकडून गोठविण्यात येणार असल्याने फिर्यादीचे कुटुंब व पेण तालुक्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Exit mobile version