। पेण । वार्ताहर ।
अन्न व औषध प्रशासनाने 22 जुलै रोजी पेण येथील निकेश पाटील यांच्या मालकीच्या एक्ट्रीन नुट्रीशीयन या दुकानवर छापा टाकून आठ प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्याचे बाजार मुल्य 1 लाख 23 हजार इतके होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन निरिक्षक किशोर मुनीराजजी राजणे यांनी 23 जुलै रोजी पेण पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंदवला होता. यातील आरोपी निकेश पाटील यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. परंतु जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन देण्यास नाकारले. मात्र एक महिना उलटून देखील निकेश पाटील याला अटक होत नसल्याने पेण शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. तसेच पेण पोलीस ठाण्याच्या कामकाजावर सामान्य नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.
सर्वसामान्यांकडून छोटासा देखील गुन्हा घडल्यास जे पोलीस कायदयाची भाषा शिकवतात ते आज हातावर हात ठेवून गप्प का? त्यांना आरोपी महिना उलटून देखील सापडत नाही, ही अश्चर्याची बाब आहे. तरुण पिढीच्या जीवाशी खेळण्याचे काम निकेश पाटील याने केलेले आहे. त्याच्या दुकानातून जे अंमली पदार्थ जप्त केले आहेत, त्याने तरुण पिढीच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. असे असतांना आरोपी पोलिसांच्या हाताला लागत नाही. ही बाब सर्वसामान्यांना न पटणारी आहे. तरी पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करुन पेण शहरात चालणार्या उलट सुलट चर्चांना पुर्णविराम देणे गरजेचे आहे.