पेण रेल्वे स्टेशनला टीसीची गरज

। पेण । प्रतिनिधी ।

पेण हे कोकण रेल्वेच्या प्रवासातील महत्त्वाचे ठिकाण आहे. एकेकाळी पेणकडे व्यापारी केंद्र म्हणून पाहिले जात होते. परंतु आजच्या स्थितीला पेण रेल्वे स्थानकात कोणत्याच लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबल्या जात नाहीत. यासाठी वेळोवेळी पेणकरांनी आंदोलन केली. रेल्वे मंत्र्यांच्या दालनापर्यंत पेणकर पोहोचले. परंतु आजही लांब पल्ल्याच्या गाड्या पेणला थांबल्या जात नाहीत. याचे महत्त्वाचे कारण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले ते म्हणजे, रेल्वे स्थानकावरून प्रवासी जास्त प्रमाणात प्रवास करत नाहीत. त्यामुळे पेण येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवता येत नाहीत. तांत्रिकदृष्टया रेल्वे प्रशासनाची ही बाब सत्य आहे. कारण प्रत्यक्षदृष्टया पेण रेल्वे स्थानकावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. हे जरी खरे असले तरी, त्या प्रमाणात रेल्वेच्या उत्पन्नात वाढ दिसून येत नाही. याचाच अर्थ मोठया प्रमाणात प्रवासी बिना तिकीट प्रवास करत आहेत. जर अशा प्रवाशांवर लगाम लावायचा असेल तर पेण रेल्वे स्थानकात पुर्ण वेळ टीसीची गरज आहे. कारण पेणकरांना जर लांब पल्ल्याच्या गाडयांसह इतर सेवा हव्या असतील तर, प्रत्येक प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करणे गरजेचे आहे. जे बिना तिकीट प्रवास करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी टीसीची गरज आहे. तसेच काही दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी जिते, आपटा, या रेल्वे स्थानकातून पुढच्या प्रवासाचे पासेस काढतात अशा प्रवाशांना देखील पकडणे गरजेचे आहे. बिना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवासांवर जोपर्यत कारवाई होत नाही, तोपर्यत पेणकरांनी कितीही उपोषण, आंदोलन करू द्या, तरी पेण रेल्वे स्थानकातून उत्पन्न दिसत नाही तोपर्यत लांब पल्ल्याच्या गाडयांसहित इतर सेवा उपलब्ध पेणकरांना होणार नाहीत.

Exit mobile version