| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या एकदिवसीय 40 षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघाने प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी खारघर संघाबरोबर झालेल्या अंतिम सामन्यात अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला असून संपूर्ण स्पर्धेची चॅम्पियनशिप पटकावली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करतांना पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघाने 35.5 षटकांमध्ये सर्व गडी गमावत 228 धावा केल्या. त्यामध्ये अभिषेक खातू यांनी सर्वाधिक 58 धावा केल्या. त्याला ऋषिकेश नाईक यांनी 39 अभिषेक जैन 37 प्रतिक म्हात्रे 24 धावांची साथ दिली. प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमीकडून सत्यम कुमार यांनी 5 हितेश नलावडे यांनी 4 फलंदाज बाद केले. 229 धावांचे लक्ष घेऊन फलंदाजीसाठी आलेल्या प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी खारघर संघानी कडवी झुंज दिली, श्रेयस कुमार यांनी चौफेर टोलेबाजी करत 92 चेंडूनमध्ये 13 चौकार व 3 षटकार ठोकत 117 धावांची दमदार खेळी केली. सामना शेवटच्या षटकापर्यंत पोचला असताना प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी संघाला जिंकण्यासाठी 13 धावांची गरज होती. मात्र, पेणच्या संघाचा भेदक गोलंदाज विनीत भोईर यांनी श्रेयस कुमार याला बाद करत सामना 6 धावांनी जिंकून दिला.पेण संघाकडून देवांश तांडेल यांनी 3 तर कर्णधार अभिषेक खातू यांनी 2 फलंदाज बाद केले.
संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पेण संघाचा कर्णधार अभिषेक खातू याला मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज संतोष गोस्वामी अष्टभुजा इंटरप्राइजेस,उत्कृष्ट गोलंदाज सत्यम कुमार प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी खारघर,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्रेयस कुमार प्रोफेशनल क्रिकेट अकॅडमी यांना पेण स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण शिंदे,प्रफुल्ल टेमघरे,प्रदिप पाटील,पेण नगरसेवक नीळकंठ म्हात्रे ,आरडीसीएचे खजिनदार प्रशांत ओक,सदस्य प्रदिप खलाटे,पंच चंद्रकांत म्हात्रे,एजाज मारूफ,आदेश नाईक यांच्या हस्ते चषक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.







