महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

साडेचारशे महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग; जिल्ह्यातील नागरिकांची कामे रखडली

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील महसूल सहाय्यक आणि सहाय्यक महसूल अधिकारी अशा एकूण साडेचारशे कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनात अलिबागसह रायगड जिल्ह्यातील तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, लेखणी बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील नागरिकांची अनेक कामे रखडली असल्याचे सांगण्यात आले असून, शासन आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वादामध्ये सर्वसामान्यांना त्रास झाल्याचे देखील बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील महसूल सहाय्यक संवर्गातून सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याबाबत यापुर्वी शासनाला निवेदन दिले आहे. या निवेदनातून महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांची भावना मांडण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर कार्यालयांमध्ये सहाय्यक महसूल अधिकारी या संवर्गासाठी 22 पदांची नवनिर्र्माती आहे. मात्र, आजपर्यंत महसूल सहाय्यक, संवर्गातून सहाय्यक महसूल अधिकारी या संवर्गात आदेश झाले नाहीत. त्यामुळे नवनिर्मित पदांना मान्यता देण्यात आली नाही. जिल्ह्यातील प्रत्येक तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालय, भूसंपादन कार्याल आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. ज्येष्ठता यादीमधील कर्मचाऱ्यांना संधी दिली नाही. त्यामुळे सहाय्यक महसूल अधिकारी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा विविध मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. शुक्रवारपासून सुरु केलेल्या या आंदोलनाला जिल्ह्यातील साडेचारशे कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला. या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लेखणीद्वारे होणारी अनेक कामे रखडली असून, दाखले व इतर कागदपत्र लेखणीद्वारे मिळणे कठीण होऊन बसले आहे.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन
जिल्ह्यामध्ये 52 पदांपैकी 14 पदे रिक्त असून 22 पदे नवनिर्माण आहेत. नायब तहसीलदार पदस्थापनेनंतर 11 पदे रिक्त होणार आहेत. सप्टेंंबर 2027 पर्यंत 5 पदे रिक्त होणार आहेत. पदोन्नती आदेश मिळावे, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. अनेक वेळा निवेदनही दिले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.
सर्वसामान्यांना त्रास
या आंदोलनात अलिबागसह रायगड जिल्ह्यातील तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे लेखणी बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील नागरिकांची लेखणीद्वारे होणारी अनेक कामे रखडली असल्याचे सांगण्यात आले. तसेच, शासन आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वादामध्ये सर्वसामान्यांना त्रास झाल्याचे देखील बोलले जात आहे.

महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लेखणीबंद आंदोलन सुरु केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. महसूल सहाय्यक, सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गातील कर्मचारी आंदोलनात सामील झाले आहेत. सरकारसह जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर येत्या दोन दिवसांत काम बंद आंदोलन करण्याच्या पावित्र्यात संघटना आहे.

भुषण पाटील,
जिल्हाध्यक्ष, रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना
Exit mobile version