| दीव | क्रीडा प्रतिनिधी |
खेलो इंडिया बीच स्पर्धेतील दुसरा दिवस महाराष्ट्रासाठी संमिश्र यशापयशाचा ठरला. बीच पेंचक सिलटमध्ये मुंबईच्या क्रीनाशी येवलेने सलग दुसऱ्या वर्षी कांस्यपदकाची कमाई केली. महिलांच्या बीच कबड्डीत हरियाणाकडून 47-26 गुणांनी महाराष्ट्र पराभूत झाला तर बीच सॉकरमधील साखळीतील सलग दोन पराभवामुळे महिला संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर रंगलेल्या बीच पेंचक सिलटमध्ये महाराष्ट्राने विजयी घोडदौड सुरू केली आहे. तुंगल प्रकारातील उपांत्यूपर्व फेरीत मुंबईच्या क्रीनाशी येवलेने कर्नाटकच्या रिशीकाला 375-368 गुणांनी पराभूत केले. क्रीनाशीने उपांत्य फेरीत धडक मारल्याने महाराष्ट्राचे स्पर्धेतील पहिले पदक निश्चित केले होते. उपांत्य लढतीत मध्यप्रदेशच्या भूमिका जैनने 407-413 गुणांनी बाजी मारली. क्रीनाशीला भूमिकाने पराभूत केल्याने तिला कांस्यपदकवर समाधान मानावे लागले. क्रीनाशीचा सराव मुंबईत व कोपरखैरणे येथे वडिल किशोर येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतो. गतस्पर्धेत बीच पेंचक सिलटमध्ये महाराष्ट्राने 3 सुवर्ण, 4 रौप्य व 5 कांस्य अशी एकूण 12 पदकांची कमाई करीत वर्चस्व गाजवले होते.
बीच कबड्डीत धडाकेबाज सलामी दिल्यांनतर महिला गटात हरियाणाकडून महाराष्ट्रला 21 गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. सुरूवातीपासून हरियाणाच्या उंचपुऱ्या मुलींनी वर्चस्व प्रस्थापित केले. पूर्वार्धात 23-14 निर्धायक आघाडी घेतल्यानंतर उत्तरार्धातही हरियाणाच्या बोलबाला दिसून आला. महाराष्ट्राकडून पूजा यादव, हर्षा शेट्टी, पौर्णिमा जेधेची झुंज अपयशी ठरली. 26-47 गुणांनी महाराष्ट्राला मोठा पराभव स्वीकारावा लागला. आता बुधवारी शेवटच्या साखळी लढतीत पंजाब विरूध्द महाराष्ट्रांची निर्णायक लढत रंगणार आहे. तसेच, बीच सॉकरमधील साखळीतील सलग दोन पराभवामुळे महाराष्ट्राचा मुलींचा संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. सलामीच्या लढतीत ओरिसाने महाराष्ट्राला 11-3 गोलने तर दुसऱ्या सामन्यात अरूणाचल प्रदेशकडून 1 -9 गोलने महाराष्ट्राला पराभूत व्हावे लागले. गतवर्षी कांस्यपदकाची कमाई करणारा बीच सॉकरमधील पुरूष संघ यंदा सुवर्णपदकासाठी सज्ज झाला आहे.







