संभाजी भिडेंविरोधात पेणकर आक्रमक

| पेण | वार्ताहर |

कायम वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहणारे संभाजी भिडे यांच्या पेण येथील मराठा समाज भवन, गणपती वाडी येथे 6 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी पेणकरांच्यावतीने तालुका प्रशासनाला करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले व करोडो भक्तांचे श्रद्धास्थान साईबाबा यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून समाजाच्या भावना दुखवणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 153 अ, 295 अ, 504 ,34 व 107 अंतर्गत गुन्हा दाखल करून करावाई करण्यात यावा अशी लेखी तक्रार पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली. तसेच भिडेंच्या पेण येथील कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असे लेखी निवेदन पेण तहसीलदारांना देण्यात आले.

भिडे यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त विधान केल्याने साईभक्तांचे मन दुखवली गेली आहेत. त्यामुळे भिडे यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी साईभक्त कल्पेश ठाकूर यांनी केली. यावेळी काँग्रेसच्या महासचिव नंदा म्हात्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक मोकल, साईभक्त कल्पेश ठाकूर बहुजन, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष, आरपीआयचे तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकनचे साईभक्त गणेश जांभळे, दिनेश खामकर, महेश म्हात्रे, हिरामण पाटील, कमळाकर पाटील यांच्यासह शेकडो साईभक्त व विविध पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपलब्ध माहितीनुसार पेण प्रशासनाने भिडे य यांच्या 6 तारखेच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली नसल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version