पेण नगरपालिका अनाधिकृत गाळेधारकांवर फिदा

अनधिकृत गाळेधारकांवर कारवाईबाबत दुर्लक्ष
। पेण । वार्ताहर ।
पेण नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी अनाधिकृत टपर्‍या व अनाधिकृत गाळे बांधणे व त्याला राजाश्रय मिळणे ही एक चढाओढ होउन बसली आहे. रायगड बाजारा पासून पुढे जाणार्‍या बायपास रस्त्या (रिंगरोड) मध्येे असाच काहिसा प्रकार झाला आहे.

आगरी समाज हॉलच्या पुढे शांती निकेतन अपार्टमेंटच्या समोर सदरील रिंगरोडची रुंदी 18 मिटर असून या रिंगरोडसाठी जवाद टाक यांच्या जागेतून हा रस्ता गेला आहे. सदरील जागेची ताबा पावती आजही नगरपालिकेला दिलेली नाही. याचाच अर्थ नगरपालिका देखील मालकाची मर्जी न घेता काम करत आहे हे सिद्ध होत आहे. तसेच जागेचे मालक जवाद टाक यांचा रस्त्याबाबत कोणताही आक्षेप नाही अगर विकासाला विरोध नाही. परंतु, त्या जागेमध्ये गोंनकर नामक व्यक्तीने अनाधिकृतरित्या गाळे बांधले असून या गाळ्यांना तातडीने बाजूला करून रस्त्याची रुंदी 18 मिटर ठेवणे गरजेचे होते असे जवाद टाक यांचे म्हणणे आहे. तसेच सदरील जागा ही जवाद टाक यांच्या मालकीची असेल तर त्याबाबत जवाद टाक यांच्या बरोबर नगरपालिकेने कागदी व्यवहार करणे गरजेचे आहे. पंरतु या अनाधिकृत गाळे धारकाला राजश्रय मिळाल्यामुळे प्रशासकीय अधिकारी देखील दुर्लक्ष करत आहेत. महत्वाची बाब म्हणजे या गाळया समोरील रस्त्याचा विचार केला तर त्याची रुंदी कमी झालेली प्रथमदर्शी दिसत आहे असे असताना देखील त्या गाळेधारकांवर कारवाई होत नाही.

याविषयी पेण नगरपालिकेचे बांधकाम अभियंता विनायक बनसोडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गाळ्या समोरील रस्ता 18 मिटरचा आहे. मात्र ती जागा जवाद टाक यांची आहे की गोंनकर यांची आहे याविषयी सांगणे टाळले. परंतु घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता 18 मिटर रस्त्याची रुंदी भरत नाही हे सत्य असल्याचे दिसत आहे.

सदरील जागा ही माझ्या मालकीची आहे. रस्त्याची 18 मिटर जागा वगळता उरलेली जागा ही माझीच आहे. त्यामुळे इतर उर्वरीत जागेत कुणीही हस्तक्षेप केलेले मी खपवून घेणार नाही. – जवाद टाक, जागामालक

Exit mobile version