पेणचे बाप्पा विदेशात रवाना; विक्रीतून १३ कोटींची उलाढाल

। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील बाराशेच्या आसपास असलेल्या छोट्या-मोठया कारखान्यांतून सुमारे 12 ते 15 लाखांच्या आसपास मातीच्या गणेशमूर्ती व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची निर्मिती होत असल्याने सुमारे पाच ते सहा हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पेण तालुक्यातून 14 ते 15 लाख गणेशमूर्ती देशविदेशात रवाना झाल्या आहेत. या गणेशमूर्तीच्या या व्यवसायातुन 13 कोटींची उलाढाल झाली आहे. तर सुंदर नक्षीकामामुळे ग्राहकांची पंसती येथील मुर्तीना आहे. हा हस्तव्यवसाय पेण तालुक्यातील बेरोजगारांना एक वरदान ठरला आहे.

पेण शहरासह ग्रामीण भागातील स्थानिक तरूण कामानिमित्त पेण शहरात गणेशमूर्ती घडविण्यासाठी गणेश चित्रकला मंदिरात रोजगारासाठी येत असतात. धोंडपाडा उंबर्डे आदी अनेक गावांतील कामगाराचा यात समावेश आहे. तर पेण तालुक्यातील पेण शहरासह, हमरापुर, तांबडशेत, जोहे, कळवे, दादर, उबर्डे, गडब, कांदळेपाडा, शिर्की,वडखळ आदि ठिकाणी तालुक्यात गणपतीचे काखाने आहेत हे कारखानदार कामगारांकडुन रोजंदारीने कामे करून घेत आहेत. त्यात त्यांना 400 ते 500 रू तर जुन्या कामगारांना 600 ते 700 रूपये. रोज दिला जातो. आखणी कामासाठीचा दर एका छोट्या नगासाठी 20रूपयांपासून 40 रूपयांपर्यंत असतो. अखेरच्या जुलै, ऑगस्ट महिन्यात रात्रपाळीसाठी प्रत्येक तासाला 40 ते 50 रूपये इतका दर दिला जात आहे. या हस्त व्यवसायात निव्वळ 5 ते 6 हजार कामगारांना रोजगार मिळतो आहे. या कलाकुसरीत तालुक्यात कोटयांवधींची आर्थिक उलाढाल होत असते.

मातीची मूर्ती तयार करण्यासाठी पहिली संकल्पना पेण येथे साकारली. अगदी सुरूवातीला शेजारील डोंगरावरील माती आणून मूर्ती तयार केली जात होती. चुना, हळद, हिंगुळ, रेवाचिनी, दिव्याची काजळी, सोनेरी वर्खाची पाने वापरून मूर्तीच्या अंगावरील वस्त्र, दागिने व अन्य अवयवांचे रंगकाम केले जात होते. पुढे या मूर्तीना जशी मागणी वाढू लागली तसा येथील मूर्तीकारांना व्यापक विचार करावा लागला. वास्तविक मूर्ती तयार करणसाठी लागणारी शाडूची माती येथे उपलब्ध नव्हती. ती गुजरात राज्यातून आणावी लागते. तर या उदयोगासाठी लागणारे रंग, गोंद, कुंचले, ब्रश, अभ्रक पॉलिश पेपर आदी साहित्य मुंबई-पुण्यावरून आणून मूर्तीकलीचा व्यवसाय केला जात आहे.

शेकडो कारखाने
एकट्या पेण शहरात गणेशमूर्तीच्या निर्मितीचे 550 ते 650 च्या घरात नोंदणीकृत कारखाने आहेत. त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर कारखाने ग्रामीण भागात व शहराच्या उपविभागात पाहायला मिळतात. मात्र, यापैकी बारमाही चालणारेही ग्रामीण व शहरी भागात शेकडो कारखाने आहेत.

पर्यावरणपूरक मूर्तींवर भर
पेण तालुक्यात असणार्‍या जेएसडब्ल्यु कंपनीने पेण तालुक्यातील सर्व गणेशमुर्तीकारांसाठी पर्यावरणपुरक, पाण्यात विरघळणारे व शरिराला हानीकारक नसणारे रंग पुरविले आहेत. यासाठी तीन दिवसांचा पेण शहरात रंगमहोत्सव भरवून प्रत्येक कारखानदाराला किमान 11 ते 12 हजार रूपये किंमतीचे पर्यावरणपुरक रंग दिल्यामुळे कारखानदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे. या तीन दिवसांत 1 हजार मुर्तिकारांनी उपस्थिती दर्शवून यावर्षी किमान 5 लाखांहून अधिक गणेशमुर्ती पर्यावरणपूरक रंगाने रंगविणार आहेत.

वाढत्या किमतीमुळे धंद्यावर परिणाम
पूर्वी 50 रूपयांची शाडूच्या मातीची गोण 150 ते 250 रूपये किमतीची झाली आहे. याआधी आठमणी (100 किलो) गोणीला नगण्य किंमत होती. मात्र ही खडा माती असल्याने ती कुटून चाळून घ्यावी लागत होती. आता ती दळून येऊ लागली असल्यामुळे त्यातील श्रम कमी झाले आहेत. त्यातच रंगाचे वाढते भावही या धंदयाला अडचणीत आणणारी बाब आहे. 30 वर्षापूर्वी चांगल्या प्रतीच्या सफेदाच्या आठ मणी गोणीला 30 रू. किंमत होती. आज सध्या सफेदच्या 25 किलो गोणीला 700 ते 800 रूपये किंमत झाली आहे. काही वर्षापूर्वी इंग्लिश कलरमुळे मूर्तीचे रंगकाम अत्यंत उठावदार व्हायचे. परंतु त्यांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने ते वापरणे शक्य होत नाही. तरीही चांगल्या प्रतिचे रंग वापरुन मुर्तिचे रंगकाम अधिक आकर्षक व उठावदार कसे होईल, असा प्रयन्त केला जातोय.

सजावटीवर अधिक भर
वस्रालंकार, हिरेजडीत व फेटेवाले गणेशमुर्तीना अधिक मागणी असुन बाजारात जरीचे मलमलीचे कपडे व ईमिटेशन ज्वेलरीचे दर वाढले असल्याने वस्त्रालंकार व हिरेजडीत मुर्तीच्या किमंतीत वाढ झाली आहे. यामध्ये दिड ते दोन फुटाची वस्त्रालकांर केलेली गणेश मुर्ती 3000 ते 4000 हजार रुपये तर हिरेजडीत 4000 ते 5000 रुपये

गणेश मुर्तितयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल या मध्ये शाडुची माती, प्लॅस्टर, रंग, विजेचे दर, मजुरीचे वाढलेले दर, वाहतुकीचे वाढलेला खर्च या मुले मुर्तीच्या दरात वाढ करावी लागली असली तरी सर्व सामान्य ग्राहकाला परवडेल अशा दरात मुर्ती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ज्वेलरी व वस्त्रालकांर व ज्वेलरीच्या मुर्तीना मागणी वाढली आहे.

– सत्यम पाटील, विश्रांती आर्ट्स, गडब



बाप्पांची परदेशवारी
तालुक्यातुन अमेरीका, सिंगापूर, थायलंड, आदि देशासह, भारतातील, गुजरात , मध्यप्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश आदि राज्यात गणेश मुर्ती रवाना झाल्या आहेत.

Exit mobile version