पेणचे शासकीय विश्रामगृह राजकीय कार्यकर्त्यांचा अड्डाच

| पेण | वार्ताहर |

पेणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृह प्रियदर्शनीची अवस्था ‘आव-जाव घर तुम्हारा’ अशी झाल्याचे दिसत आहे. विश्रामगृहाच्या परिसरात राजकीय पदाधिकारी यांचा वावर जास्त राहत असल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे कुणीही बाहेरील व्यक्ती येते आणि आपली वाहने पार्किंग करून जातात. येथील संबंधित चौकीदारांची परवानगीदेखील घेत नाहीत. आव-जाव घर तुम्हारा, याप्रमाणे हे रिकामटेकडे नागरिक वावरत असल्याचे दिसून आले. तसेच या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष झालेले दिसत आहे. पेण शहरातील शासकीय विश्रामगृहात शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना वाजवी दरात विश्रामगृहात राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यासाठी अगोदर शुल्क भरून आरक्षण करून ठेवावे लागते. आरक्षणासाठी 24 तासांसाठी भाडे आकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तेथे नको त्या व्यक्तींचा सर्रासपणे वावर सुरु असल्याने हे शासकीय विश्रामगृह नेमके आहे कुणासाठी, असा प्रश्न पेणच्या नागरिकांना पडला आहे.

रिकामटेकड्यांचा वावर
शासकीय विश्रांतीगृहाामध्ये ज्यासाठी आरक्षण आहे त्यापेक्षा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी, पाटर्या मोठया प्रमाणात पहायला मिळतात. येथील अधिकारी देखील आपल्या परिचयाच्या व्यक्तींना बिनधास्तपणे विश्रांतीगृह वापरण्यासाठी देतात. उबंरडा विश्रांतीगृह तर ठेकेदार आणि राजकीय कार्यकर्त्यांचा अड्डाच झालेला आहे. दोन्हीही विश्रांतीगृहामध्ये खानसामा (स्वयंपाकी) नसल्यामुळे बाहेरुनच अन्न पदार्थ आणले जातात आणि मोठया प्रमाणात विश्रांतीगृहामध्ये घाण केली जाते. कधी कधी तर रम-रमी चे डाव रंगले जातात.

गांधी मंदिरच्या मागच्या बाजुला विश्रामगृह आहे. त्यात एकूण 4 रूम आहेत तसेच व्ही.आय.पी 2 रूम आहेत. या विश्राम गृहाचे भाडे सरकारी नोकरदारांना दिवसाचे 150 रू भाडे आहे तर प्रायव्हेट लोकांना 400 रू व व्हि.आय.पी. रुमचे भाडे 500 रू या प्रमाणे एका दिवसामागे भाडे आकारले जाते. दोन ठिकाणी असलेल्या शासकीय विश्रामगृहाची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसिंचन विभागाकडे देण्यात आली आहे. दरवर्षी विश्राम गृहाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो. परंतु त्या निधीचा किती उपयोग केला जातो या बाबत ही साशंकता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version