रामवाडी येथील विभागीय कार्यालयाचा प्रताप उघड
| अलिबाग | प्रमोद जाधव |
एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कष्टाची जमापुंजी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पेन्शनमध्ये झालेल्या घोळामुळे सेवानिवृत्तीनंतर त्यांचे जगणेही मुश्कील झाले आहे. जिल्ह्यातील डेपोसह विभागीय कार्यालयाकडून चुकीची माहिती भविष्य निर्वाह भत्ता कार्यालयात पाठविण्यात आली. त्याचा फटका जिल्ह्यातील 99 हून अधिक पेन्शनधारकांना बसला आहे. निवृत्तीला सात वर्षे होऊनही या कर्मचाऱ्यांना पेन्शनच मिळाली नाही. तसेच काही कर्मचारी सेवानिवृत्त नसताना, त्यांच्या नावाची पेन्शन चालू करून घेण्यात आली आहे. रामवाडी येथील विभागीय कार्यालयातील प्रताप यातून उघड झाला आहे. त्यामुळे यामागे नक्की काय अर्थकारण लपले आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एसटी महामंडळ रायगड विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव, श्रीवर्धन, मुरूड, महाड असे आठ एसटी बस आगार आहेत. जिल्ह्यात 19 बस स्थानके आहेत. जिल्ह्यात 480 हून एसटी बसेस आहेत. यापैकी 300 हून अधिक बसेस सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. एसटीतून महिन्याला एक लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यातून एसटीला महिन्याला 37 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळते. रायगड विभागात अडीच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये चालक व वाहकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी सुखरुप सोडण्याचे काम चालक व वाहक करतात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी हे कर्मचारी काम करतात.
जिल्ह्यामध्ये गेल्या सात वर्षांपासून अनेक एसटी कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी 25 वर्षांपासून 36 वर्षांपर्यंत सेवा देण्याचे काम केले. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांचा थाटामाटात निरोप समारंभ केला जातो. मात्र, सेवा करून कमविलेली पुंजी पुढील आयुष्यासाठी उपयोस यावी, म्हणून शासनाच्या तिजोरीत जपून ठेवली असतानाही त्यांना ती वेळेवर मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. पेन्शन विभागाचे कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सेवानिवृत्त कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शनपासून वंचित आहेत. अलिबागसह अन्य आगारांतील कार्यालयाकडून विभागीय कार्यालयात त्यानंतर विभागीय कार्यालयाकडून नवीन मुंबई येथील भविष्यन निर्वाह भत्ता कार्यालयात पेन्शनधारकांची सर्व माहिती व कागदपत्रे पाठविण्याचे काम केले जाते. परंतु, डेपोतील क्लार्क आणि विभागीय कार्यालयातील क्लार्ककडून माहिती चुकीची पोहोचत असल्याने अनेक कर्मचारी पेन्शनपासून दूरच असल्याचा प्रकार समोर आला आहे.
सेवानिवृत्त होऊन सात वर्षे झाली आहेत. तरीदेखील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली नाही. काही कर्मचाऱ्यांचे चुकीचे नाव, त्याच्या नातेवाईकांचे चुकीचे नाव, जन्म वर्ष अशी चुकीची माहिती विभागीय कार्यालयाकडून भविष्य निर्वाह भत्ता कार्यालयात पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला आहे. त्यांच्या भोंगळ कारभारामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनपासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे विभागीय कार्यालयातील सावळागोंधळ समोर आला आहे.
पेन्शन नसल्याने अनेकांना घरखर्च कसा चालवावा, असा प्रश्न समोर झाला आहे. त्यामुळे गलथान कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्याचे विभागीय नियंत्रक दिपक घोडे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
क्लार्कच्या भोंगळ कारभाराचा फटका
रात्रीचा दिवस करून चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सेवा देण्याचे काम केले. एसटी महामंडळ विभागात 36 वर्षांपासून 25 वर्षे सेवा करून अनेकजण सेवानिवृत्त झाले. मात्र, अलिबागसह अन्य आगारांतील क्लार्कच्या भोंगळ कारभाराचा फटका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बसला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या नावात चूक असण्यापासून जन्म वर्ष व इतर चुकीची माहिती पाठविल्याने सेवानिवृत्त कर्मचारी अजूनही पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या क्लार्कच्या कामांबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
एसटी महामंडळाचा गलथान कारभार
एसटी महामंडळ रायगड विभागातील आगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर.एम. नाईक, पी.डी नाईक अशा नावाची नोंद केली जाते. या नोंदीचा फटका पेन्शन मिळताना होत आहे. एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे अनेकजण पेन्शनपासून वंचित राहिले असल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी जून महिन्यात सेवानिवृत्त झालो आहे. सेवानिवृत्त होऊन एक वर्षे एक महिना झाला आहे. पेन्शन वेळेवर मिळावी, म्हणून लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता अलिबाग कार्यालयासह रामवाडी येथील कार्यालयात करण्यात आली. परंतु, अजूनपर्यंत पेन्शन मिळाली नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. याबाबत अलिबागमधील कार्यालयात जाऊन विचारणा केल्यावर तेथील क्लार्ककडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. अनेकांची पेन्शनची रक्कम थकली आहे. कार्यालयातील गलथान कारभाराचा त्रास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होत आहे.
प्रसन्न पाटील,
सेवानिवृत्त कर्मचारी
एसटी महामंडळ रायगड विभागातील मुरूड एसटी बस आगारात चालक म्हणून 25 वर्षे सेवा केली आहे. 2022 मध्ये मी सेवानिवृत्त झालो. मात्र, मला 2019 मध्ये सेवानिवृत्त दाखवून माझ्याच्या नावाच्या अन्य कर्मचाऱ्याच्या नावे पेन्शन काढण्यात आली आहे. याबाबत नवी मुंबई येथील भविष्य निर्वाह भत्ता कार्यालयात जाऊन माहिती दिली. त्यानंतर रामवाडी येथील विभागीय कार्यालयात जाऊन सांगितले. ही चूक विभागीय कार्यालयाकडून झाल्याचे पत्र भविष्य निर्वाह भत्ता कार्यालयाला दिले आहे. परंतु, अद्याप पेन्शन देण्याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मोठी आर्थिक हानी झाली आहे. कमविलेली पुंजी पेन्शनच्या रुपात वेळेवर मिळत नसल्याने खूप त्रास होतो.
राजेंद्र नाईक,
सेवानिवृत्त चालक
पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या ज्या त्रुटी होत्या, त्या सोडविण्यात आल्या असून, पेन्शन कार्यालयाला त्याची माहिती पाठविण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची चुकीची माहिती गेलेली आहे, त्याबाबत योग्य ती कार्यवाही करुन त्यांना पेन्शन सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
दिपक घोडे,
विभागाय नियंत्रक, पेण







