जुनी पेन्शन लागू होईपर्यंत आमदारकीची पेन्शन स्वीकारणार नाही

माजी आ.बाळाराम पाटील यांचा निर्धार

| पनवेल | वार्ताहर |

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील 17 लाखांहून अधिक सरकारी, निमसरकारी कर्मचारी मंगळवारपासून (दि.14) बेमुदत संपावर गेले आहेत. पनवेल येथे तहसीलदार कार्यालयांमध्ये आंदोलनकर्त्या शासकीय कर्मचार्‍यांची माजी आमदार बाळाराम पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी त्यांनी जोपर्यंत कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत मी सुद्धा माझ्या आमदारकीच्या पेन्शनसाठी अर्ज करणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

आंदोलनकर्त्यांची भेट घेतल्यानंतर बाळाराम पाटील म्हणाले की, जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. सहा महिन्यापूर्वी शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काढलेल्या दिंडीमध्ये देखील जुनी पेन्शन योजना लागू करणे ही सगळ्यात महत्त्वाची मागणी होती. एक राजकीय कार्यकर्ता म्हणून नव्हे तर एक संवेदनशील माणूस या नजरेतून मी या आंदोलनाकडे पाहतो आणि म्हणून मला त्यांची मागणी अत्यंत रास्त वाटते. गेली 40 वर्षे ज्या ज्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थान उपभोगले त्या सगळ्यांना या पेन्शन योजनेअंतर्गत निधी देताना कुठेही काहीही आडवे आले नाही. परंतु आत्ताच्या सरकारने मात्र तिजोरीवर पडणार्‍या बोजाचे अनाकलनीय कारण दिल्यामुळे तो तमाम कर्मचार्‍यांवरती अन्याय होईल असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते.

या वेळी मा. आमदार बाळाराम पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, निमंत्रक विश्‍वास काटकर, पनवेल तालुका अध्यक्ष अर्जुन भगत, प्रकाश पाटील प्रभाकर नाईक, जुनी पेन्शन शिक्षक संघटनेच्या पनवेल तालुका अध्यक्ष राजश्री राजेंद्र मोकल आदी पदाधिकार्‍यांच्या समवेत तमाम कर्मचारी बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये पराभव पदरी पडल्यानंतर देखील आजतागायत मी पेन्शन साठी अर्ज केलेला नाही आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना माझ्या सरकारी, निमसरकारी कर्मचारी बांधवांना लागू होत नाही तोपर्यंत तसा अर्ज मी करणार देखील नाही.

बाळाराम पाटील, माजी आमदार
Exit mobile version