भाजपविरोधात पेन्शनधारक आक्रमक

वाढीव पेन्शनसाठी उठवले रान

| तळा | वार्ताहर |

घटनेप्रमाणेच नाही तर न्यायालयाने आदेश देऊनही देशातील ईपीएस पेन्शनधारकांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या, तर अच्छे दिनचा फसवा जाहीरनामा घोषित करुन गेली दहा वर्षे सत्ता भोगणाऱ्या भाजपविरोधात ईपीएस पेन्शनधारकांनी रान उठवले असून, वाढीव पेन्शन नाही तर सत्ताधारी भाजपला मतदान नाही. पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, या सरकारचे करायचे काय खाली डोकं, वर पाय अशा आंदोलनाद्वारे घोषणा देऊन जिल्हा कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

देशात शेकडो उद्योग व्यवसाय आणि सेवेच्या माध्यमातुन देश प्रगतीपथावर आणून महासत्तेकडे वाटचाल करू पाहणाऱ्या देशातील लाखो कामगार वर्गाने आपले तारुण्यातील आयुष्य वेचले, त्या कामगारांच्या बुध्दीच्या, कष्टाच्या आणि मेहनतीच्या जीवावर देशाची प्रगती झाली हे मान्य असताना त्याचाच ईपीएस फंडातून जमा केलेल्या रकमेतून वाढीव पेन्शनची रास्त मागणी गेले अनेक वर्षे लावून धरली असून, त्या मागणीला केंद्रातही शेकडो खासदारांनी उठाव केल्याची नोंद आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात देशातील ई.पी.एस 95 पेन्शनधारकांनी लढा उभा केला. यापूर्वी संघटनेच्या माध्यमातून निवेदने दिल्ली, मुंबई कार्यालयात दिली, काही राज्यांत रास्ता रोको, रेल रोको, महामार्ग रोको करून सरकारचे लक्ष वेधूनही मूकबधीर सरकारला हालवून जागे करण्यासाठी पेन्शन संघटनेने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून देशातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाच्या अर्थमंत्री माननीय, निर्मला सीतारामन, तसेच देशाचे कामगार मंत्री भूपेंदर यादव यांना निवेदन देऊन आम्हा कामगार वर्गाच्या हक्काची वाढीव पेन्शनची मागणी केली आहे.

दरम्यान, आमच्या पेन्शनधारकांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर नाईलाजाने आम्हाला नाराजी व्यक्त करुन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात मतदान करण्याशिवाय पर्याय रहाणार नाही असा इशारा वजा धमकीच दिलीआहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देताना वाढीव पेन्शन नाहीतर सत्ताधारी भाजपला मतदान नाही अशा घोषणाही दिल्या. यावेळी रायगड जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण अंबुर्ले, उपाध्यक्ष दिलीप मेथा, सचिव श्रीराम वलवनकर, खजिनदार किशोर टमके, विजयकुमार कदम, अशोक बडे आदी कार्यकारिणी सदस्यांसह जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version