ओएनजीसी कंपनीत परप्रांतीयांची भरती, बेरोजगार संघटना करणार बेमुदत आंदोलन.
| उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात नागाव म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत ओएनजीसी प्रकल्प सुरु असून या प्रकल्पासाठी नागाव व म्हातवली मधील ग्रामस्थांनी आपल्या शेकडो पिकत्या जमिनी ओएनजीसी प्रकल्पाला दिल्या. त्या बदल्यात ओएनजीसी प्रकल्पग्रसतांना नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रकल्प सुरु होऊन अनेक वर्षे उलटूनही स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य दिले गेले नाही. उलट येथे नोकर भरती मध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला असून तसेच कंपनीच्या मनमानी कारभारामुळे येथील स्थानिक भूमीपुत्रावर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे.
उपजीविकेचे कोणतेच साधन उपलब्ध नसलेल्या नागाव म्हातवली मधील बेरोजगार कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. अनेकदा पत्रव्यवहार करून सुद्धा ओएनजीसी कंपनी प्रशासन स्थानिक भूमीपुत्रांच्या मागण्याकडे लक्ष देत नसल्याने आता येथील स्थानिक भूमीपुत्र नागाव म्हातवली बेरोजगार संघटना आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरु राहणार आहे.सोमवारी (दि.28) ओएनजीसी द्रोणागीरी भवन ए.पी.यु गेट समोर, उरण येथे सकाळी 9:30 वाजल्यापासुन जाहीर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नागाव-म्हातवली बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू यांनी दिली.