शिहू बेणसे विभागातील जनता वीज समस्येने हैराण

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शिहू बेणसे विभागाची वीजसमस्या मागील अनेक वर्षांपासून जैसे थे दिसून येते. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असो कोणत्याही ऋतूत विजबत्ती गुल होऊन विजेचा लपंडाव सुरूच असतो. वर्षानुवर्षे विजवीतरण विभागाकडून जनतेला वेठीस धरले जातेय. रोज रात्री विजबत्ती गुल होत असल्याने शिहू बेणसे विभागातील जनता प्रचंड त्रासलीय. तर विजवितरण विभागाच्या विरोधात जनमानसातून असंतोषाची लाट उफाळून आलीय. शिव्यांची लाखोली देखील या दरम्यान वाहिली जातेय. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, पळता भुई थोडी करू, विजवीतरंण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विरोधात जनमाणसातून संताप व्यक्त होत आहे. अजून मुसळधार पाऊस व अतिवृष्टी सुरू झालेली नाही तरी विज वीतरण विभाग पहिल्या सरीत नापास झाला ही अवस्था दिसून येते.
शिहू बेणसे परिसरासह अन्य भागात विजेचा लपंडाव काही केल्या थांबेना. रात्री मच्छर रक्त पित आहेत. याबरोबरच उन्हाळ्यात उष्म्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे येथील नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत. विजेचा लपंडाव थांबवा, वीजपुरवठा सुरळीत करा, सहनशीलतेचा अंत पाहू नका,अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा संताप महिला वर्ग व तरुणवर्गाने दिला आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होणे नित्याचेच झाले आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक,बालबच्चे वृद्ध सारेच बेजार झाले आहेत. लहान मुले रात्रभर रडत आहेत, रुग्ण देखील त्रासले आहेत. खंडित झालेला वीजपुरवठा केव्हा पूर्ववत होईल याचा अंदाज येत नसल्याने नागरिक सतत चिंतेत असतात.विजवीतरण अधिकारी व कर्मचारी मात्र मंद गतीने पाऊले टाकताना दिसत आहेत. विजबत्ती गुल झाल्यावर कर्मचारी नॉटरीचेबल होतायत. विजवीतरण कर्मचार्‍यांची कार्य तत्परता दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

शिहू बेणसे विभागातील जनतेला वर्षातील बाराही महिने विजसमस्येला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्धुत विज वितरण मर्यादित कंपनी अंतर्गत शिहू बेणसे विभागात अनेक गावे व आदिवासींवाड्यापाड्याना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र आजमितीस सातत्याने विजेचा लपंडाव सुरूच असून विद्धुत देयके मात्र आवाक्याच्या बाहेर येत असल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.

या विभागात आदिवासीवाड्यापाड्यांचा समावेष असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे. सर्प,विंचू व किटकांची भिती असल्याने अंधारात घराबाहेर बाहेर पडणे नागरीकांना धोक्याचे झाले आहे. तसेच डास व मच्छरांच्या उपद्रवाने नागरीकांच्या आरोग्य देखील धोक्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर व्यवसाईक व व्यापारी वर्गाचे देखील नुकसान होत आहे. विजपुरवठा सुरळीत असो अथवा नसो विजबिल मात्र न चुकता येत असून ते वेळेत भरण्याची सक्ती केली जाते. विजबिल भरण्यास विलंब झाल्यास विजपुरवठा खंडीत करण्याच्या वेगवान प्रक्रीयेला येथील नागरीकांना सातत्याने सामोरे जावे लागते. दरम्यान विजवीतरण अधिकारी व कर्मचारी यांनी या विभागाची विजसमस्या कायम संपविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Exit mobile version