वडगावातील महिलांची पाण्यासाठी पायपीट
। पाताळगंगा । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील पाताळगंगा परिसरात असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत वडगावला नुकताच माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या पाच घटकांच्या आधारावर कोकण विभागात पहिला, तर राज्यात सातवा क्रमांक मिळला आहे. यामुळे ग्रामपंचायतीला 50 लाखांचे बक्षीस प्राप्त झाले असल्याने तालुक्यात वडगाव ग्रामपंचायतीच्या नावाचा गवगवा सुरू झाला आहे. मात्र, वडगावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून, महिलांच्या डोक्यावरील हंडा अजून उतरलेला नसल्याचे विधायक सत्य समोर आले आहे. याबाबत वडगाव येथील महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
शासनाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे बक्षीस मिळविलेल्या वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीमधील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे माझी वसुंधरा अभियानांतर्गत 50 लाखांचे बक्षीस मिळविलेल्या वडगाव ग्रामपंचायतीने असे कोणते काम केल्याचा भास शासनाच्या कमिटीला दाखविला आणि स्वतःला बक्षीस मिळवून पाठ थोपटून घेतली आहे? प्रत्यक्षात मात्र वडगावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला नसल्याचे विदारक चित्र समोर येत असल्याने मिळालेला पुरस्कार कोणत्या निकषांवर दिला आहे, याबाबत ग्रामस्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू झाली आहे.
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मजल दरमजल करून पाणी मिळवावे लागत असल्याचे सत्य पुढे आले आहे. गावात नळपाणी पुरवठा योजना असून, पाणी दोन-चार दिवसांतून एकदाच मिळत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. मिळणारे पाणीसुद्धा मुबलक प्रमाणात मिळत नसल्याचा आरोप येथील महिलांनी केला आहे. येथील महिलावर्गाला गेली अनेक वर्षे डोक्यावर हंडा घ्यावा लागत आहे. याचसोबत रस्त्याची बिकट अवस्था असल्यामुळे वयोवृद्ध, शाळकरी मुले यांस नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे ग्रामपंचायतीचे अजिबात लक्ष नसल्याचा आरोप केला जात आहे.
खालापूर तालुक्यातील नावरुपाला असलेली ग्रुप ग्रामपंचायत वडगाव येथे महिलावर्गांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. गावामध्ये नळ योजना असूनही पाणी मिळत नाही. पावसाळ्यात ही स्थिती असेल तर उन्हाळ्यात गंभीर स्थिती निर्माण होईल. यामुळे आमच्या डोक्यावरील हंडा उतरणार तरी केव्हा?
– सुरेखा गडगे, ग्रामस्थ महिला, वडगाव
वडगावातील परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना देणार असून, लवकरच येथील ग्रामस्थांच्या प्रश्नाचे समाधान होईल अशी व्यवस्था केली जाईल.
– संदीप कराड, गटविकास अधिकारी, खालापूर