पालीत मर्कटलीलांनी नागरिक हैराण

पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली गावात माकड व वानरांनी मागील काही महिन्यांपासून अक्षरशः उच्छाद घातला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. काही लोकांवर देखील या माकडांनी हल्ले करून जखमी केले आहे. त्यामुळे या माकडांची दहशत माजली आहे.
या वानर व माकडांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी वनविभाग व तालुका प्रशासनाकडे विद्येश आचार्य यांनी निवेदनाद्वारे केली आहे. उपद्रवी माकडांचा लवकरात लवकर बंदोबस्त झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे मत स्थानिक रहिवाशी व्यक्त करत आहेत.
पालीमधील रामआळी, बाजारपेठ, देऊळवाडा, मधली आळी, खडकाळी,कासारआळी, सोनारआळी, आगरआळी, बेगरआळी, उंबरवाडी, सावंतआळी, अशा सर्वच गजबजलेल्या भागात माकडे आणि वानरे रोज धुमाकूळ घालत आहेत. मोठमोठी वानरे आणि माकडे छतावर उड्या मारून घराचे पत्रे व कौले फोडतात. तसेच ड्रेनेजचे पाईप, विजेच्या तारा, गच्चीत ठेवलेले सामान, पाण्याच्या टाक्या, झाडाच्या कुंड्या, झाडे यांचे अतोनात नुकसान करत आहेत. त्यांच्या या उपद्रवामुळे झाडे, फळे, फुले यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवितास देखील धोका निर्माण झालाय. बाहेर कोणत्याही गोष्टींचे वाळवण घालता येत नाही. इतकेच नव्हे तर घराची दारे, खिडक्या पण उघड्या ठेवणे अवघड झाले. घरात शिरून माकडे अन्नधान्य, भाजीपाला यांची नासाडी करत आहेत. वाळत घातलेले कपडे देखील फाडून टाकतात. यामुळे मोठी आर्थिक हानी होत आहे. अनेकदा ही माकडे वाहनांवर देखील उड्या मारतात, तर कधी टेरिस च्या पत्र्यावर धुडगूस घालतात, या माकडांना रोखण्याची गरज आता नागरिकांमध्ये व्यक्त होतेय.

Exit mobile version